मुंबई : सध्या देशात मतदार याद्यांचा घोळ आणि ‘मतचोरी’च्या आरोपांचे प्रकरण गाजत आहे. त्यातच भारतात राहणाऱ्या एका नेपाळी दाम्पत्याने बनावट मतदार ओळखपत्राच्या आधारे महाराष्ट्रात अनेकदा मतदान केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यांना मतदार ओळखपत्र कसे मिळाले आणि मतदान कसे केले, याचा सहार पोलीस तपास करत आहेत.

१८ ऑगस्ट रोजी नेन सिंग बिस्ट (६१) आणि त्यांची पत्नी पार्वती देवी बिस्ट (५९) ऑस्ट्रेलियाहून मुंबई विमानतळावर आले होते. त्यांच्याकडे नेपाळी पारपत्र होते. भारतात येण्याचे समाधानकारक कारण त्यांना सांगता आले नाही. हे जोडपे नेपाळी नागरिक आहेत. ते १९९५ मध्ये भारतात आले आणि पनवेलच्या कामोठे येथे राहू लागले. त्यांच्याकडे भारतीय पॅनकार्ड, आधार कार्ड तसेच मतदार ओळखपत्रही मिळाले आणि त्यांचे नावही मतदार यादीत आहे. विमानतळावरील ‘इमिग्रेशन’ अधिकाऱ्यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तपासणी केली असता त्यांचे नाव मतदार यादीत आढळून आले.

चौकशीत या नेपाळी दाम्पत्याने महाराष्ट्रातील ५ ते ६ निवडणुकीत मतदान केल्याची कबुली दिली. या दोघांविरोधात सहार पोलीस ठाण्यात बनावट दस्तावेज तयार करणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३६ (२), ३३६ (३) ३४० (२) आणि ३१८ (४) अन्वये गुन्हे दाखल केले आहे.

कागदपत्रांचा तपास सुरू

भारत आणि नेपाळ या दोन्ही देशात दुहेरी नागरिकत्व घेता येत नाही. भारतीय नागरिकाशिवाय अन्य कुणालाही मतदार ओळखपत्र, भारतीय पारपत्र काढता येत नाही. आरोपी नेपाळी असून अनेक वर्षे भारतात वास्तव्य करत आहेत. त्यांनी कुठून ही कागदपत्रे तयार केली त्याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश चाळके यांनी दिली. असे अनेक नेपाळी आणि बांग्लादेशी नागरिक भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत असून त्यांनी मतदान केल्याचा पोलिसांना संशय आहे.