मुंबई : २०१८ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या पहिल्या हिंदी वेबमालिकेला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सैफ अली खान आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांची मुख्य भूमिका असलेल्या या वेबमालिकेमुळे भारतीय प्रेक्षक याकडे आकृष्ट झाले होते. तेव्हापासून भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केलेल्या नेटफ्लिक्सला २०२१ ते २०२४ या तीन वर्षांत देशातून १६ हजार कोटींचा फायदा (२०० कोटी डॉलर) फायदा झाला, अशी माहिती नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी वेव्हज परिषदेत दिली.

‘वेव्हज’ परिषदेच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी अभिनेता सैफ अली खान याने टेड सारंडोस यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी नेटफ्लिक्सने भारतात केलेल्या गुंतवणुकीचा कसा फायदा झाला याविषयी विवेचन केले. नेटफ्लिक्सच्या फायद्यातून भारतीय निर्मितीसंस्थांसाठी जवळपास २० हजार कलाकार – तंत्रज्ञांसाठी रोजगार उपलब्ध झाला, अशी माहिती त्यांनी दिली. आत्तापर्यंत देशातील जवळपास ९० शहरांमधून नेटफ्लिक्सने वेबमालिकांचे चित्रीकरण केले असून १५० भारतीय वेबमालिका आणि वेबपटांची निर्मिती केली आहे.

गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर जगभरातील लोकांकडून ३ अब्ज तास भारतीय आशय पाहिला गेला. शिवाय, दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या पहिल्या दहा सर्वोत्तम वेबमालिका वा वेबपटांच्या यादीत एक भारतीय मालिका हमखास असायचीच, असेही त्यांनी सांगितले.

स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब कथानिर्मितीत गरजेचे

कुठल्याही माध्यमासाठी भारतीय चित्रपटकर्मींनी त्यांच्या मातीतल्या कथानिर्मितीवर अधिक भर द्यायला हवा. भारतीय कथा असलेला आशयच जगभर अधिक लोकप्रिय होतो आहे, हेही सारंडोस यांनी अधोरेखित केले.