मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणी बाग) पेंग्विनच्या इंग्रजी नावांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राणीच्या बागेत मोर्चा काढून पेंग्विनना देण्यात आलेल्या इंग्रजी नावांवरून प्रशासनाला जाब विचारलाय. दरम्यान, पेंग्विनची नावे कार्टुनच्या पात्रांवरून ठेवण्यात आल्याचा खुलासा करीत प्रशासनाने हात झटकण्याचा प्रयत्न केला.
राणीच्या बागेतील पेंग्विनची संख्या हळूहळू वाढत असून या पेंग्विनना इंग्रजी नावे देण्यात आल्याबद्दल भाजपने आक्षेप नोंदवला आहे. मात्र पेंग्विनना कोणत्याही भाषिक किंवा सांस्कृतिक हेतून नावे ठेवलेली नाहीत. ही नावे केवळ कार्टूनमधील पात्रांवरून ठेवलेली असून, लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या कार्टून विश्वातील नावे वापरल्यामुळे मुलांना पेंग्विन अधिक आवडतील आणि त्यांच्याशी जोडले जातील, हा उद्देश होता, असे राणी बागेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, राणी बागेतील पेंग्विनसाठी मोल्ड, डोनॉल्ड, डेसी, पोपॉय, ऑलिव्ह, बबल, ओरिओ, बिंगो, निमो, जेरी, फ्लिपर, ॲलेक्सा, सिरी, डोरा, कोको आणि स्टेला अशी नावे देण्यात आली आहेत. यातील अनेक नावे प्रसिद्ध कार्टून पात्रांशी सामर्थ्य साधणारी आहेत. मात्र, प्रशासनाचा यामध्ये कोणताही राजकीय अथवा भाषिक हेतू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर सध्या राणी बागेत असलेल्या पेंग्विनची नावासहित माहिती दिल्लीकडे दिलेली आहे. त्यामुळे या नावांमध्ये आता कोणत्याही प्रकारचे बदल होऊ शकत नाही, असेदेखील स्पष्ट केले आहे.
दरम्यान, दक्षिण कोरियातून २०१६ मध्ये मुंबईमधील राणीच्या बागेत हबोल्ट प्रजातीचे पेंग्विन आणण्यात आले होते. तेव्हापासून पेंग्विन राणी बागेतील प्रमुख आकर्षण बनले आहे. त्यांच्यासाठी खास वातानुकूलित पिंजरा, तापमान नियंत्रण यंत्रणा आणि देखभालीसाठी खास कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
पेंग्विनच्या नावाचा अर्थ
बबल- प्रसिद्ध ॲनिमेटेड पात्र
फ्लिपर- नृत्य करणारे पेंग्विन
तज्ज्ञांचे मत काय
– लहान मुलांना प्राण्यांशी जोडण्यासाठी कार्टूनसारखी नावे फायदेशीर असतात.
– नावे कार्टूनची असल्यामुळे लहान मुलांना ती लक्षात ठेवायला सोपी असतात.
समाज माध्यमावर विरोध
भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या या मोर्चावर समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. याचबरोबर कारण नसताना भाषिक तेढ निर्माण केली जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तसेच अनेकांनी पाळीव प्राण्यांची नावे काय असतात याचा विसर पडला आहे का असा प्रश्नही उपस्थित केला.