मुंबई: देशात संसर्गजन्य आजारांचा प्रसार वाढल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या नव्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी–मार्च) संसर्गाचे प्रमाण १०.७ टक्के होते, तर दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल–जून) ते वाढून ११.५ टक्क्यांवर गेले. म्हणजेच केवळ तीन महिन्यांच्या अवधीत संसर्गदरात ०.८ टक्के अंकांची वाढ झाली आहे. आयसीएमआरच्या व्हायरस रिसर्च अँड डायग्नॉस्टिक लॅबोरेटरी (व्हीआरडीएल) नेटवर्कने देशभरातील प्रयोगशाळांमधून एकूण ४.५ लाख नमुने तपासले. त्यापैकी ११.१ टक्के रुग्णांमध्ये रोगकारक घटक (पॅथोजेन्स) आढळले. या तपासणीत पाच प्रमुख विषाणूंचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निष्पन्न झाले .
यात प्रामुख्याने अक्यूट इन्फेक्शन (एआरआय) व गंभीर तीव्र श्वसन संसर्ग प्रकरणांमध्ये इन्फ्लुएंझा ए,तीव्र ताप व रक्तस्रावजन्य तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू विषाणू, पिवळ्या कावीळीत हिपॅटायटिस ए, तीव्र अतिसाराच्या साथीमध्ये नोरोवायरस, तर तीव्र मेंदूज्वर प्रकरणांमध्ये हर्पीज सिंप्लेक्स व्हायरस आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान तपासलेल्या २,२८,८५६ नमुन्यांपैकी २४,५०२ नमुने संसर्गित होते, तर एप्रिल ते जून या काळात तपासलेल्या २,२६,०९५ नमुन्यांपैकी २६,०५५ नमुने पॉझिटिव्ह आढळले. संसर्गदरातील ही वाढ लहान वाटत असली तरी तिला कमी लेखू नये, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
एका वरिष्ठ वैज्ञानिकांच्या मते,ही वाढ हंगामी आजारांच्या वाढत्या प्रमाणाकडे आणि नव्याने उद्भवणाऱ्या संसर्गांकडे लक्ष वेधणारी आहे. संसर्गदरातील तिमाही बदलांचे सतत निरीक्षण केले तर भविष्यातील साथी वेळेत ओळखून रोखता येऊ शकतील.दरम्यान एप्रिल ते जून या काळात देशभरात १९१ रोगकेंद्रे तपासण्यात आली. त्यात मम्प्स, गोवर, रुबेला, डेंग्यू, चिकुनगुनिया, रोटाव्हायरस, नोरोवायरस, व्हॅरिकेला झोस्टर व्हायरस, एपस्टीन-बार व्हायरस आणि अॅस्ट्रोव्हायरस अशा अनेक संसर्गजन्य आजारांची नोंद झाली आहे.
जानेवारी ते मार्च दरम्यान तपासलेल्या ३८९ रोगकेंद्रांमध्ये मम्प्स, गोवर, रुबेला, हिपॅटायटिस, डेंग्यू, चिकुनगुनिया, रोटाव्हायरस, इन्फ्लुएंझा, लेप्टोस्पायरा, व्हॅरिकेला झोस्टर व्हायरस आणि लैंगिकरित्या प्रसारित होणारे आजार आढळले होते.२०१४ ते २०२४ दरम्यान देशभरातून घेतलेल्या ४० लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १८.८ टक्के नमुने संसर्गित आढळले आहेत. आयसीएमआरच्या व्हीआरडीएल नेटवर्कचा विस्तार २०१४ मध्ये असलेल्या २७ प्रयोगशाळांवरून २०२५ पर्यंत वाढून ३१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील १६५ प्रयोगशाळांपर्यंत झाला आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून आतापर्यंत २,५३४ रोगकेंद्रांची देशभरात ओळख झाली आहे.
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते व्हीआरडीएल नेटवर्क हे देशासाठी एक प्रकारचे ‘अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ म्हणून कार्य करते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा उद्रेक होण्यापूर्वीच त्याचा मागोवा घेता येतो आणि आवश्यक आरोग्य पावले उचलता येतात.एका वरिष्ठ वैज्ञानिकांच्या मते, ही वाढ मोठी वाटत नसली तरी तिला कमी लेखू नये कारण ती हंगामी आजार व नव्याने उद्भवणाऱ्या संसर्गांबाबतचा इशारा ठरू शकते.
