मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील ७० कोटी रुपये चारकोप येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात गुंतवण्यात आले तर उर्वरीत ४० कोटी रुपये सोलर पॅनल व्यावसायिकाला देण्यात आली असून महाव्यवस्थापक हितेश मेहताने स्वत:ही काही रक्कम वापरल्याचे चौकशीत सांगितले. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. गेल्या पाच वर्षांपासून आरोपीने प्रभादेवी व गोरेगाव शाखांतील तिजोरीतील रकमेचा अपहार करण्यास सुरूवात केली होती, मग ही बाब लेखा परिक्षणात कशी समजली नाही, यावरही पोलीस तपास करत आहेत.

याप्रकरणातील मुख्य आरोपी व बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहताने करोनाकाळात ठेवीदारांचे पैसे व्याजाने दिल्याचा संशय आहे. करोनाकाळात अनेक व्यावसायिकांच्या व्यवसाय ठप्प होता. व्यावसायिकांना पैशांची नितांत गरज असल्याचे पाहून हितेशने बँकेतील ठेवीदारांचे पैसे व्याजाने देण्यास सुरूवात केल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे. या गैरव्यवहारात हितेशसह आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धर्मेश पौन यालाही अटक केली आहे. धर्मेश हा बांधकाम व्यावसायिक असून त्याचा झोपडपट्टी प्रकल्प चारकोप येथे सुरू आहे. हितेशने धर्मेशला व्यवसायासाठी ७० कोटी रुपये दिल्याचे कबूल केले आहे. काही वर्षांपूर्वी हितेशने धर्मेशकडून एक सदनिका खरेदी केली होती. त्यावेळी दोघांमध्ये मैत्री झाली होती. कालांतराने धर्मेशकडून घेतलेला सदनिका विकण्यात आली. तसेच सौरऊर्जा यंत्रणा पुरवणारे व्यवसायिक उन्ननाथन अरूणाचलम ऊर्फ अरूणभाई यालाही ४० कोटी रुपये दिल्याचे चौकशीत हितेशने सांगितले आहे. त्यालाही याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. याशिवाय हितेशने स्वत:ही बँकेची रक्कम वापरल्याचे चौकशीत सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैसे व्याजाने देऊन हितेशने किती रक्कम कमावली याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. हितेश हा वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. त्याने १९८७ मध्ये बँकेत सेवेस सुरुवात केली होती. या वर्षी ऑक्टोबरमध्ये तो निवृत्त होणार होता. त्याची २००२ मध्ये महाव्यवस्थापक आणि हेड अकाउंटंट म्हणून नियुक्ती झाली. प्राथमिक चौकशीत हितेशने प्रभादेवी शाखेतून ११२ कोटी रुपये, तर गोरेगाव शाखेतून १० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड होत आहे.