दहिसर – आरे मार्गावर नवी मेट्रो ; मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

गाड्यांची संख्या एकूण नऊ – आता १७२ फेऱ्या होणार

दहिसर – आरे मार्गावर नवी मेट्रो ; मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
( दहिसर – आरे मार्गावर नवी मेट्रो )

दहिसर – आरे मेट्रो मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांच्या ताफ्यात सोमवारी एका नवीन मेट्रो गाडीची भर पडली आहे. ‘घरोघरी तिरंगा’ या संकल्पनेवर आधारित रंगरंगोटी केलेल्या नव्या मेट्रो गाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखविला. आता मंगळवारपासून ही गाडी दहिसर – आरे मार्गिकेवर धावणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईतील वाहतूक सेवेत एप्रिलपासून दुसरी मेट्रो मार्गिका दाखल झाली आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओपीएल) माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या या मेट्रो मार्गिकेवर सध्या आठ मेट्रो गाड्या धावत आहेत. आता मंगळवारपासून यात एका गाडीची भर पडणार असून एकूण गाड्यांची संख्या नऊ होणार आहे. या गाडीमुळे आता दोन गाड्यांमधील अंतर कमी होऊन दहा मिनिटांवर येणार आहे. तसेच मेट्रोच्या फेऱ्या वाढून १७२ होणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन मेट्रो गाडी सेवेत दाखल झाली असून यामुळे मेट्रो सेवेला बळकटी मिळणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे भविष्यात वाहतुकीचा एक उत्तम पर्याय नागरिकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे रेल्वेवरील ताण कमी होईल, वाहतूक कोंडी दूर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या कामाला वेग द्या आणि मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करा. राज्य सरकार यासाठी आवश्यक ती सर्व मदत एमएमआरडीएला करेल, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New metro on dahisar aarey route the chief minister showed the green flag mumbai print news amy

Next Story
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग धोक्याचा ; साडेचार वर्षात ४०० जणांचा मृत्यू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी