मुंबई : महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील विवाह नोंदणी सेवाअंतर्गत आता शनिवार व रविवारी देखील विवाह नोंदणी (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) करता येणार आहे. एवढेच नव्हे तर, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज होणाऱ्या नोंदणीपैकी २० टक्के नोंदणी या ‘जलद विवाह नोंदणी सेवा’ म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहेत. या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे नवदाम्पत्याचा सरकारी कार्यालयात खर्च होणारा वेळ वाचणार आहे. ही सेवा २१ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहेत.

प्रशासकीय कामकाजात सुलभता आणणे, तसेच नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये वेग आणणे, यासाठी महापालिकेतर्फे विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये सुलभता आणली आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे प्रत्येक दाम्पत्यासाठी महत्त्वाचे दस्तावेज असते. वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी ते आवश्यक असते. अलीकडच्या आकडेवारीनुसार, महानगरपालिकेमध्ये वर्षभरात सुमारे ३० ते ३५ हजार विवाहांची नोंदणी होते.

मात्र, प्रत्यक्षात यापेक्षा अधिक विवाह होतात. विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये वेळेअभावी अडचणी व गैरसोयीमुळे अनेकांची पालिकेकडे विवाह नोंदणी होत नाही. या अडचणी कमी व्हाव्यात, विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी महानगरपालिकेमार्फत नवे उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पालिकेने विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये दोन नवीन सेवा समाविष्ट केल्या आहेत.

नवीन सेवांपैकी एक सेवा ही कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमधील ‘जलद विवाह नोंदणी सेवा’ (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) ही आहे. तर दुसरी आठवडा अखेरीची विवाह नोंदणी सेवा (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) आहे. या दोन्ही सेवांसाठी नियमित नोंदणी शुल्क, अधिक अतिरिक्त शुल्क रुपये २,५०० रुपये इतकी एकूण रक्कम आकारण्यात येणार आहे. दोन्ही सेवांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तपासणी व शुल्क भरणा ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित दाम्पत्याला दिले जाईल.

नवदाम्पत्य व साक्षीदारांना विवाह नोंदणीसाठी सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन वेळेत, विवाह निबंधकासमोर (विभागीय आरोग्य अधिकारी) प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांना कामकाजाच्या दिवसांमध्ये अतिरिक्त सुटी घेवून विवाह नोंदणीसाठी महानगरपालिकेकडे यावे लागते. संबंधितांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महानगरपालिकेने शनिवार व रविवार या दोन्ही सुटीच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत विवाह नोंदणी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी म्हणजे दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या कामकाजाच्या पाच दिवसांमध्ये होणारी विवाह नोंदणीदेखील जलद व्हावी, संबंधितांना वारंवार महानगरपालिका कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी आणखी एक सेवा कार्यान्वित करण्यात येत आहे. ‘जलद विवाह नोंदणी सेवा’ म्हणून ही सेवा ओळखली जाईल.

प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये, सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी, दररोजच्या ३० विवाह नोंदणी कोट्यामधून २० टक्के म्हणजे एकूण ६ विवाह नोंदणी या ‘जलद विवाह नोंदणी सेवा’ म्हणून राखीव राहतील. या जलद नोंदणीचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्याना सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करून त्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

दर शनिवारी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांपैकी – ए, सी, ई, एफ दक्षिण, जी दक्षिण, एच पूर्व, के पूर्व, पी दक्षिण, पी उत्तर, आर मध्य, एल, एम पश्चिम, एस या तेरा विभाग कार्यालयांत विवाह नोंदणी सेवा देण्यात येईल. तर, दर रविवारी बी, डी, एफ उत्तर, जी उत्तर, एच पश्चिम, के पश्चिम, पी पूर्व, आर दक्षिण, आर उत्तर, एन, एम पूर्व, टी या बारा विभाग कार्यालयांत विवाह नोंदणी करता येईल, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.