मुंबई : मुंबई-अहमदाबाद शहरांतील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम केले जात आहे. या मार्गातील पुलाचे काम झपाट्याने सुरू असून नुकताच गुजरातमधील खेडा जिल्ह्यात २१० मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला आहे.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमण येथे पायाभूत सुविधा उभ्या केल्या जात आहेत. आतापर्यंत १३ नद्यांवरील पूल आणि पाच स्टीलचे पूल पूर्ण झाले आहेत. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियादजवळील दाभान गावात राष्ट्रीय महामार्ग ४८ (दिल्ली-चेन्नई) ओलांडण्यासाठी २१० मीटर लांबीच्या प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट पुलाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले. हा पूल आणंद आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान आहे. तेथे वलसाड जिल्ह्यातील पंचलाईजवळील वाघलधारा गावात राष्ट्रीय महामार्ग ४८ वर पूल बांधण्यात आला आहे. गुजरातमध्ये अनेक ठिकाणी ट्रॅक बांधण्याचे काम सुरू झाले असून महाराष्ट्रात वांद्रे-कुर्ला संकुल आणि ठाण्यादरम्यान २१ किमी बोगद्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) च्या माध्यमातून सात डोंगरी बोगदे खोदले जात आहेत. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात एक डोंगरी बोगदा पूर्ण झाला आहे.

हेही वाचा…मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील औषध पुरवठा ठप्प, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय पुरवठा न करण्याचा वितरकांचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये, यासाठी या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. या मार्गाच्या ५०८ किमीपैकी आतापर्यंत ११२ किमी परिसरात ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत. बुलेट ट्रेन नागरी भागातून जात असताना प्रचंड ध्वनिप्रदूषण होण्याची शक्यता आहे. ट्रेनच्या खालच्या मुख्यतः रुळाच्या घर्षणाने येणाऱ्या कर्कश्श आवाजाने आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन मार्गाच्या दोन्ही बाजूला ध्वनी अवरोधक बसवून आवाज कमी केला जाईल, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) देण्यात आली.