मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याच्या संशयावरून ३८ वर्षीय परदेशी नागरिकाला ताब्यात घेतले होते. या परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेनने भरलेल्या ७७ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. या कोकेनची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे. याप्रकरणी आरोपीला गुरूवारी अटक करण्यात आली असून यासंदर्भात डीआरआय अधिक तपास करत आहे.

हेही वाचा >>> इको पार्कसाठी आरक्षित भूखंडावर ईव्हीएम यंत्रे ठेवण्यासाठी गोदाम; निवडणूक आयोगाच्या कृतीची उच्च न्यायालयाकडून दखल

कोउअॅमे डेनिस (५८) असे या परदेशी नागरिकाचे नाव असून तो मूळचा नायजेरियामधील रहिवासी आहे. तो आयवरी कोस्ट पारपत्रावर प्रवास करत होता. डेनिस ६ मे रोजी कोचिन येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. तस्करी करीत असल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या पोटात अमली पदार्थ असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्याची वैद्याकीय चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. जे.जे. रुग्णालयात त्याचा एक्सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात संशयीत कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून या ७७ कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन १४६८ ग्रॅम असून त्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे. मुख्य आरोपीने त्याला कोकेन व विमानाचे तिकीट दिले होते. मुंबईत कोकेन नेण्यासाठी पैसे देण्याचे डेनिसने चौकशीत कबुल केले होते. आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्याने हे काम करण्यास होकार दिला होता.