मुंबई : गेल्या तीन दिवसांमध्ये मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेला अडथळा आणि रस्ता रोकोसह सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा आणल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी तब्बल नऊ गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व गुन्हे सोमवारी नोंदवण्यात आले असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे गुन्हे बेकायदेशीर जमाव जमवणे आणि रस्ता रोको यासारख्या कलमांखाली नोंदवण्यात आले आहेत. काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जबरदस्तीने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
या संदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तीन, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दोन, तर एमआरए मार्ग, जे.जे. मार्ग, डोंगरी आणि कुलाबा येथील पोलीस ठाण्यांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे सर्व गुन्हे सोमवारी नोंदवले असून, यात सहभागी सर्वांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र संबंधित कलमांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, साधारणपणे राजकीय आंदोलनांतील गुन्हे काही महिन्यांनंतर मागे घेण्यात येतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. बहुतेक प्रकरणांमध्ये आंदोलकांनी वाहतूक ठप्प करणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन करणे यासंबंधी तक्रारी आहेत.
सरकारने मंगळवारी आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले आणि ते गावांकडे परतले. आंदोलनाला शुक्रवारी सुरुवात झाली होती. शनिवारीपर्यंतच परवानगी असूनही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले. पोलिसांनी घाललेल्या अटींचे यावेळी पालन झाले नाही, असेही स्पष्ट झाले.