मेल-एक्स्प्रेस, लोकलचे बिघडणारे वेळापत्रक आणि त्यामुळे होणारा खोळंबा यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवासी गेले वर्षभर त्रस्त आहेत. रेल्वे गाड्यांमधील आपत्कालिन साखळी विनाकारण खेचण्याच्या प्रवाशांच्या प्रवृत्तीमुळे मेल-एक्स्प्रेस, लोकलचा खोळंबा होत असल्याचे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईसह राज्यातील एकूण पाच विभागांत जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत तब्बल नऊ हजार ४९ प्रकरणांमध्ये मेल-एक्स्प्रेस, तसेच लोकलच्या डब्यांतील आपत्कालिन साखळी विनाकारण खेचल्याने रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याचे उघडकीस आले आहे.
हेही वाचा- मध्य रेल्वेवर नाहूर – मुलुंड आणि विक्रोळी – मुलुंडदरम्यान रात्रकालीन ब्लाॅक
गाडीचा थांबा नसलेल्या ठिकाणी उतरायचे असल्याने, तसेच सहप्रवासी वेळेत न येणे किंवा फलाटावरच थांबणे, फलाटावर सामान विसरणे, मोबाइल गाडीतून खाली पडणे, अपंगाच्या डब्यात अन्य प्रवाशांचा प्रवास यासह विविध कारणांमुळे साखळी खेचण्याचे प्रकार घडतात. मात्र साखळी खेचल्यानंतर गाडी पुन्हा सुरू होण्यासाठी किमान दहा मिनिटांपेक्षाही अधिक अवधी लागतो. अशा वेळी मागून येणाऱ्या अन्य गाड्या थांबण्याशिवाय पर्याय नसतो.
परिणामी, रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते. विनाकारण साखळी खेचल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड किंवा एक वर्षांपर्यंत शिक्षा किंवा दोन्ही होऊ शकते. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या काळात मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर या विभागांमध्ये एकूण नऊ हजार ४९ प्रकरणांत विनाकारण आपत्कालिन साखळी खेचण्याचे उघडकीस आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विनाकारण साखळी खेचल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या आठ हजार १७६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५५ लाख ८६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई विभागात सर्वाधिक तीन हजार ३०२ प्रवाशांना पकडण्यात आले असून भुसावळ विभागात दोन हजार ४७६, नागपूर विभागात एक हजार २४, पुणे विभागात एक हजार १७३ आणि सोलापूर विभागात २०२ जणांचीही धरपकड करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.