मुंबई : राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (एनआयआरएफ) २०२५ पुन्हा एकदा आयआयटी मद्रासने अव्वल स्थान पटकावले आहे. सर्व शैक्षणिक संस्था व अभियांत्रिकी अशा दोन गटांमध्ये आयआयटी मद्रास अव्वल ठरले आहे. एम्स दिल्ली, जेएनयू, आयआयएससी बंगळूरुसह आयआयटीने पहिल्या १० क्रमांकांवर वर्चस्व कायम ठेवले आहे.
देशातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे २०१६ पासून दरवर्षी एनआयआरएफ यादी जाहीर करण्यात येते. शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी क्रमवारीची १० वी आवृत्ती जाहीर केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एनआयआरएफ २०२५ यादी जाहीर केली. भारतातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून सलग सात वर्ष आयआयटी मद्रासला आपला लौकीक कायम राखण्यात यश आले आहे.
सलग १० वर्ष अभियांत्रिकी क्रमवारीत ते अव्वल स्थानावर आहे. आयआयटी मद्रासने शैक्षणिक संस्था, अभियांत्रिकी, नवोन्मेष आणि शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) बंगळुरूला २०२५ साठी देशातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले. आयआयएससी बंगळुरूने सलग दहाव्या वर्षी आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
विद्यापीठ क्रमवारीत आयआयएससी बंगळुरूनंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि मणिपाल ॲकेडमीचा क्रमांक लागला आहे. जेएनयूने गेल्या वर्षीचे स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. दिल्ली विद्यापीठाने गेल्या वर्षीच्या सहाव्या स्थानावरून या वर्षी पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. वास्तूकला आणि नियोजनात आयआयटी रूरकी अव्वल स्थानावर राहिली. आयआयटी मुंबईने नवोपक्रमात प्रथम स्थान पटकावले. वैद्यकीय क्षेत्रात एम्स नवी दिल्ली पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे.
देशभरातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करण्यासाठी एक पारदर्शक आणि व्यापक चौकट प्रदान करण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने २०१५ मध्ये प्रथम एनआयआरएफची सुरुवात केली होती.
१७ श्रेणींत क्रमवारी जाहीर
एनआयआरएफ २०२५ क्रमवारीमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी जुळणारे नवीन मूल्यांकनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली आणि प्रादेशिक भाषांचा अवलंब करण्याबरोबरच वैविध्यपूर्ण उच्च शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या १७ श्रेणींमध्ये क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यात विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, वैद्यकीय, दंत, कायदा, वास्तुकला आणि नियोजन, कृषी आणि संबंधित क्षेत्रे, मुक्त विद्यापीठे, कौशल्य विद्यापीठे, शाश्वत विकास उद्दिष्ट आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठे यांचा समावेश आहे.
अव्वल १० शैक्षणिक संस्था
१) आयआयटी मद्रास
२) आयआयएससी बंगळूरू
३) आयआयटी मुंबई</p>
४) आयआयटी दिल्ली
५) आयआयटी कानपूर
६) आयआयटी खरगपूर
७) आयआयटी रुरकी
८) एम्स दिल्ली
९) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
१०) बनारस हिंदू विद्यालय