हिंम्मत असेल तर ओपन जिमला हात लावून दाखवा, हे शिवसेनेचे आव्हान शनिवारी नितेश राणे यांनी स्विकारले. वेळ आणि दिवस सांगून जिम काढायला येऊ, चिंता नको, असे ट्विट करून नितेश यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. अंगावर आलात तर शिंगावर घेण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला आता शिंगं राहिलेत कुठे, असा खोचक टोलाही यावेळी राणेंनी हाणला. मुंबई महानगरपालिका या जिमवर काय कारवाई करते ते पाहू. अन्यथा, ती अनधिकृत जिम तिथून निघणारच, असा सज्जड इशाराही नितेश राणे यांनी शिवसेनेला दिला.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मरिनड्राईव्ह येथे साकारलेल्या खुल्या जिमच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि नितेश राणे यांच्यात हा वाद उफाळून आला होता. ही जिम अनधिकृत असल्याची मागणी करत ती हटविण्यात यावी, अशी मागणी नितेश राणेंनी पालिकेकडे केली होती. त्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत ‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’, असा इशारा देत नितेश राणेंना ‘हिंम्मत असेल तर ओपन जिमला हात लावून दाखवा’, असे आव्हानच दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane accepts shiv sena challenge over open gym
First published on: 18-07-2015 at 01:15 IST