मुंबई : शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे यांना कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

विधिमंडळाबाहेर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्याच्या हेतूने आपल्याला लक्ष्य केले जात आहे. तसेच खोटय़ा प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा नितेश यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेत केला आहे. अ‍ॅड. संग्राम देसाई यांच्यामार्फत नितेश यांनी ही याचिका केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदाराचे नितेश यांच्यासोबत शत्रुत्व असल्याचा प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) कोणताही उल्लेख नाही, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, नितेश हेच परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यामागे असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. भीती निर्माण करण्याच्या हेतूने हा हल्ला घडवून आणण्यात आल्याचा दावा पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात नितेश यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना केला होता. अन्य आरोपींसोबतची नितेश यांची छायाचित्रेही पोलिसांनी सत्र न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली होती. अटक आरोपींची पृष्टी करण्याच्या दृष्टीने नितेश यांचा या आर्थिक किंवा राजकीय गुन्ह्यातील सहभाग शोधण्यासाठी त्यांच्या कोठडीची आवश्यकता असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन आणि पोलिसांचे म्हणणे मान्य करत सत्र न्यायालयाने नितेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.