शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्यांची मदत घेता येऊ शकते. सोयीनुसार नगरपालिका व महापालिकेत हे काँग्रेस-राष्ट्रवादीशी हात मिळवणी करू शकतात. तेच आता ‘आम आदमी पार्टी’वर काँग्रेसशी हातमिळवणी केल्याची टीका करतात हा विनोदच म्हणायला हवा, अशा शब्दांत ‘आप’चे नेते मयांक गांधी यांनी शिवसेनेला टोला लगावला. ‘आप’ला परदेशातून मिळणाऱ्या मदतीवर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाची माहिती देण्याची हिम्मत दाखवावी,असे आव्हानही त्यांनी दिले.
‘आम आदमी पार्टी’ला मिळालेले यश आणि दिल्लीत सत्ता स्थापन केल्यापासून शिवसेनेच्या खूपच पोटात दुखत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मुखपत्रातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने अरविंद केजरेवाल व ‘आप’वर टीका करीत असल्याचे मयांक गांधी म्हणाले. मुळात आम्ही कोणत्याच पक्षाकडे पाठिंबा मागितलेला नाही. काँग्रेसने जो पाठिंबा दिला आहे तो त्यांच्या मर्जीने दिला आहे. काँग्रेस असो की अन्य कोणता पक्ष असो भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आम्ही कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही. लोकपालाच्या नियुक्तीनंतर सर्वप्रथम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचा घोटाळा आम्ही बाहेर काढणार आहोत. त्यामुळे काँग्रेसने पाठिंबा द्यावा की न द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे.
कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना ‘आप’ला लोकांनी भरभरून पाठिंबा दिला यातच सारे काही आले. दिल्लीत सरकार स्थापन केल्यानंतर दोनच दिवसात पाणी व विजेच्या संदर्भातील आश्वासन खरे करून दाखवले. मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी लालबत्तीची गाडी घेतली नाही. मंत्री किंवा मंत्रालयात कोणताही सुरक्षेचा बडेजाव नाही, यातील नेमकी कोणती गोष्ट शिवसेना नेतृत्वाला खुपते आहे, असा सवालही त्यांनी केला.
आम आदमी पर्टीला महाराष्ट्रातही मिळणारा पाठिंबा पाहून शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळेच दिल्लीतील विरोधी पक्षनेते डॉ. हर्षवर्धन यांच्या भाषणाचा आधार घेत, सेना नेतृत्वाची मुंबईत टीकेची कसरत सुरू आहे. उद्धव ठाकरे जेवढी ‘आप’वर टीका करतील तेवढे लोक सेनेच्या विरोधात जातील आणि आमच्याकडे वळतील, असेही गांधी म्हणाले.
राष्ट्रवादीच्या भ्रष्ट मंत्र्यांविरोधात लढणार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या २२ जागा लढण्याची घोषणा केली असून त्यांच्या मंत्र्यांसह भ्रष्ट उमेदवारांच्या विरोधात ‘आम आदमी पार्टी’ लढणार असल्याचे मयांक गांधी यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. राष्ट्रवादीने लोकसभेच्या २२ जागा लढण्याची घोषणा करतानाच मंत्र्यांनाही निवडणुकीत उतरविण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादीचे बहुतेक मंत्री भ्रष्ट्राचाराने बरबटलेले असून त्यांच्या विरोधात ‘आप’ उमेदवार उभे करेल असे गांधी म्हणाले. शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले आहे. ते जर निवडणूक लढले तर त्यांच्याही विरोधात ‘आप’चा उमेदवार असेल असेही गांधी म्हणाले.
‘आप’च्या धास्तीने सेनेची फुकट पाण्याची ‘हूल