यापूर्वी शिवाजी पार्कचे ‘शिवतीर्थ’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडून मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी शिवसेनेला अडचणीत आणले होते. आता मुंबईकरांना पालिका गेली दहा वर्षे ५६६ लिटर पाणी मोफत देते असा ‘जावई शोध’ लावून त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला अडचणीत आणले आहे. महापालिका प्रतिमाणशी ९० लिटर पाणी पुरवठा करते. एका कुटुंबात अगदी सहा व्यक्ती जरी गृहित धरल्या तरी कुटुंबाला दररोज ५४० लिटर पाणीपुरवठा होईल. असे असताना ५६६ लिटर मोफत पाणीपुरवठय़ाचा दावा केवळ ‘आप’च्या भीतीपोटी शिवसेनेने केल्याचे पालिकेतील विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
मुंबईच्या एक कोटी २५ लाख लोकसंख्येसाठी ४२०० दशलक्ष लिटर पाण्याची रोजची गरज असताना प्रत्यक्षात ३५०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पालिकेचे पाणीपुरवठा खाते सध्या प्रतिमाणशी ९० लिटर पाण्याचा पुरवठा करत असून नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींना ४५ लिटर प्रतिमाणशी पाणीपुरवठा करण्याची पालिकेची योजना आहे. मात्र चौथ्यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बनलेल्या राहुल शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार पालिका प्रत्येक कुटुंबाला १०७५ लिटर पाणीपुरवठा करत असून त्यातील ५६६ लिटर पाणी मोफत देते. मुळातच पालिकेकडून एका कुटुंबाला एवढा पाणी पुरवठा होत नसून महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी २०१३-१४च्या सादर केलेल्या अर्थसंकल्पातच मध्यवैतरणा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मागणीच्या मानकानुसार प्रतिमाणशी १३५ लिटर पाणीपुरवठा करता येईल, असे स्पष्टपणे म्हटले आहे. पाणी खात्याच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये तर १५० लिटर ते २०० लिटर पाण्याचा प्रतिमाणशी वापर झाल्यास सध्याच्या दुप्पट दर लावावे तसेच २०१ ते २५० लिटपर्यंत तिप्पट आणि २५१ लिटरपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्यांकडून चौपट दर वसूल करण्याची शिफारस आहे. गेल्या दहा वर्षांतील एकाही पालिका आयुक्ताने अर्थसंकल्प सादर करताना मोफत पाणी देत असल्याचे म्हटलेले नाही. मुंबईत पाणी आणण्यासाठी येणारा खर्च व पालिका आकारत असलेला दर असे जरी गणित मांडले तरीही पालिकेकडून एका कुटुंबाला जर १०७५ लिटर पाणीपुरवठाच केला जात नाही तर मोफत पाण्याचा प्रश्नच कुठे येतो असा सवाल पाणी खात्याच्याच काही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी ‘करून दाखवले’ जाहिरात करताना मोफत पाण्याचा ‘जावईशोध’ कसा लक्षात आला नाही, असा सवाल मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे ‘राहुल’ही असेच उशीरा जागे होतात तर शिवसेनेचे ‘राहुल’ पाण्याची थाप मारण्यासाठी अशीच उशीरा जाग आल्याचेही देशपांडे म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘आप’च्या धास्तीने सेनेची फुकट पाण्याची ‘हूल’
यापूर्वी शिवाजी पार्कचे ‘शिवतीर्थ’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडून मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे

First published on: 06-01-2014 at 01:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scared of aap shiv sena set to give free water