”काँग्रेस – राष्ट्रवादीचे आमदार फुटतील असं आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, आता जनमत भाजपाच्याविरोधात गेलं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कोणी फुटण्याचं धाडस करू शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे. जर कोणी फुटलाच तर आम्ही सर्व मिळून त्याचा पराभव निश्चितपणे करणार आहोत”, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलाताना म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी अद्याप भेट झालेली नसल्याने, त्यांच्यात आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याबद्दल माहिती नाही, असे देखील सांगितले. तसेच,अध्यक्ष निवडीची वेळ आली तर आघाडीचा उमेदवार आम्ही निश्चतच देणार आहोत. जर भाजपने दिलेल्या उमेदवाराचा किंवा अध्यक्षांचा पराभव झाला तर सरकारचा पराभव असतो, असंही ते म्हणाले
याचबरोबर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सध्या पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात आज जरी काळजीवाहू सरकार असलं, तरी त्यांची या परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी ही सहानभूतीची दिसत नसल्याचेही सांगितले आहे.
दरम्यान, शिवसेनेची तयारी असल्यास राज्याला आम्ही पर्यायी सरकार देण्याचा विचार करू असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी केलं आहे. तसंच राज्यावर राष्ट्रवपती राजवट लागू होऊ देणार नसल्याचंही ते म्हणाले. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी सत्तास्थापनेचा तिढा मात्र सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम असून नवाब मलिकांच्या नव्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
