मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांतील पाणीसाठा कमी होत असला तरी तूर्तास पाणीकपातीपासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. घटत्या पाणीसाठ्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे. सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात मिळून एकूण २२.६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून हा पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरविण्याचे पालिकेचे नियोजन आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाने मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून राखीव पाणीसाठा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुंबईत पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी सुमारे ३ हजार ९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ इतकी असून सध्या या धरणांमध्ये एकूण ३ लाख २८ हजार ०४२ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईत सद्यस्थितीत पाणीकपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

धरणांमध्ये उपलब्ध असलेला २२.६६ टक्के पाणीसाठा येत्या ३१ जुलैपर्यंत पुरविण्याचे नियोजन पालिकेच्या जल अभियंता विभागाने केले आहे. हवामान खात्याशी समन्वय साधून पावसासंबंधीचा अंदाज लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी महापालिका मुख्यालायात सोमवारी उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर मुंबईत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेला भातसा आणि अप्पर वैतरणा धरणाच्या निभावणी साठ्यातून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे यापूर्वीच मान्य केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पाणीकपातीची कोणतीही आवश्यकता नाही. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे. त्याचबरोबर, पावसाच्या आगमनाबाबत हवामान खात्यासोबत समन्वय साधून पुढील निर्णय घेतला जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

धरणांत साठा किती

सध्या ऊर्ध्व वैतरणा धरणात १८.८३ टक्के, मोडकसागरमध्ये २८.०६, तानसामध्ये १८.८६, मध्य वैतरणामध्ये २५.४२, भातसामध्ये २२.३५, विहारामध्ये ३४.०४ तर तुळशीमध्ये ३५.२७ इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

अधिकृत पाणीकपात नाही, पण… मुंबई शहर, उपनगरांत महापालिकेने पाणीकपात जाहीर केली नसली तरी अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक भागांतील रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईमुळे नागरिक त्रासले असताना पालिकेने पाणीकपात केली नसल्याचा दावा केला आहे.