मुंबई : वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम परिसराचा समावेश असलेल्या भागात गुरुवार, ३१ ऑगस्ट रोजी १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ९ पासून रात्री ११ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून काही भागात कमी दाबाने पाणी येईल. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आजच पाण्याचा साठा करून ठेवावा लागणार आहे.
वांद्रे पश्चिमेकडील पाली हिल जलाशयाच्या इनलेट व आऊटलेटवरील एकूण चार झडपा (व्हॉल्व्ह) बदलण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. गुरुवार, ३१ जुलै रोजी सकाळी ९ पासून रात्री ११ पर्यंत एकूण १४ तास हे काम सुरू राहणार आहे. या कालावधीत वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम परिसराचा समावेश असलेल्या एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
या भागांचा पाणीपुरवठा खंडित
– हनुमान नगर, लक्ष्मी नगर युनियन पार्क मार्ग क्रमांक १ ते ४, पाली हिल आणि च्युईम गावाचा काही भाग या ठिकाणी नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० दरम्यान आहे. मात्र या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
– नर्गिस दत्त मार्ग, पद्मश्री देव आनंद मार्ग (जिग जॅग मार्ग), पाली माला मार्ग येथे नियमित पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १०.०० ते मध्यरात्री १.०० दरम्यान आहे. येथेही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
– कांतवाडी परिसराचा काही भाग, पाली नाका, पाली गावठाण, शेरली, राजन व माला गावाचा काही भाग येथे नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० असून येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
– खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युईम गावठाण, गझधरबंध झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग येथे नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री १०.०० असून येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
चार – पाच दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे
या विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून, गाळून प्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.