लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी वाढत असून, सामान्य उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनाने सामान्य उपनगरी गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा घाट घातला आहे. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित उपनगरीमुळे इतर उपनगरी रेल्वेगाड्यांचा खोळंबा होत असून पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडू लागला आहे. यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने गर्दीच्या वेळी सकाळी ९.५३ वाजता सोडण्यात येणारी गोरेगाव – चर्चगेट जलद लोकल फेरी रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
पश्चिम रेल्वेवरील अनेक सामान्य लोकल रद्द करून वातानुकूलित लोकल चालवण्यात येत आहेत. तसेच वातानुकूलित लोकलमुळे सहा सामान्य लोकलच्या वेळा आणि एका लोकलचा बोरिवली थांबा रद्द करण्यात आला होता. तर, आता सकाळी ९.३५ च्या बोरिवली – चर्चगेट जलद वातानुकूलित लोकलमुळे सकाळी ९.५३ ची गोरेगाव – चर्चगेट जलद लोकल रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
आणखी वाचा-शिखर बँक गैरव्यवहारप्रकरण : बँकेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही
शासकीय, खासगी कार्यालयातील बहुसंख्य कर्मचारी सकाळी गोरेगाव स्थानकातून चर्चगेटला जात असतात. विरार, बोरिवली येथून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. बोरिवलीहून सुटणाऱ्या अर्धजलद लोकलमध्ये बोरिवली – मालाडदरम्यान प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे गोरेगावमधील प्रवाशांना लोकलमध्ये चढताच येत नाही. काही प्रवासी जीव धोक्यात घालून लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करतात. त्यामुळे गेल्या १० – १२ वर्षांपासून गोरेगाव, जोगेश्वरीमधील प्रवाशांसाठी गोरेगाव – चर्चगेट लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सकाळी ८.२५, ८.५७ , ९.३३ आणि ९.५३ वाजताच्या गोरेगाव – चर्चगेट जलद लोकलचा समावेश आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये वातानुकूलित लोकलमुळे या लोकलच्या वेळेवर परिणाम झाला असून या लोकलचा वक्तशीरपणा विस्कळीत होत आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेने वक्तशीरपणा सुधारण्यसाठी गोरेगाव – चर्चगेट लोकल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा-मुंबई : ते मत मागायला येतील, तुम्ही माती काढायला सांगा! शिवाजी पार्कच्या रहिवाशांचा निवडणूक पवित्रा
लोकल सुरू ठेवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम
गोरेगाव येथून प्रवास सुरू करणाऱ्या पुरुष आणि महिला प्रवाशांची प्रचंड गर्दी अधिक असते. या लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या महिलांनी पुढाकार घेऊन, सकाळी ९.५३ ची गोरेगाव – चर्चगेट लोकल सुरू राहावी यासाठी लोकलमध्ये स्वाक्षरी मोहीम राबविली.
पश्चिम रेल्वे सामान्य लोकल रद्द करून, त्याजागी वातानुकूलित लोकल चालवत आहे. गोरेगाव – चर्चगेट लोकल रद्द केल्यास सकाळी ११ वाजता कार्यालयात कसे पोहचायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. -रेखा निकम, प्रवासी
सकाळच्या गोरेगाव – चर्चगेट लोकलमध्ये बसण्यास जागा मिळते. त्यामुळे सोयीस्कर प्रवास होतो. इतर लोकलमध्ये शिरण्यास जागा मिळणार नाही. त्यामुळे वर्दळीच्या वेळी धावणारी ही लोकल रद्द करू नये. -कल्पना दिवाण, प्रवासी
आणखी वाचा-भाजपबाबत विरोधकांचा अपप्रचार; काँग्रेस राजवटीत ८० घटनादुरुस्त्या; विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर
सकाळी ९.५३ ची गोरेगाव – चर्चगेट लोकल कायमस्वरूपी बंद होणार नाही. सध्या टीआरटी यंत्राद्वारे स्लिपर नूतनीकरणासाठी अंधेरी – विलेपार्ले दरम्यान अप मार्गावर वेगमर्यादा आहे. ज्यामुळे या मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. वेगावरील निर्बंध शिथिल झाल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत होतील. तसेच सकाळी ९.५३ ची गोरेगाव – चर्चगेट लोकल रोज रद्द केली जाणार नाही, असे प्रशासनाने सांगितले.
वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद आणि खुले होण्यासाठी अधिक अवधी जातो. त्यामुळे संपूर्ण पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडतो. परिणामी, पश्चिम रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी डिसेंबर २०२३ मध्ये सहा सामान्य लोकलच्या वेळेत काही मिनिटांनी बदल केला. तर, सकाळी ७.५५ वाजता सुटणाऱ्या विरार – चर्चगेट जलद लोकलचा बोरिवली थांबा रद्द केला.