मुंबई : मुंबई महानगरपालिकेने उत्तर मुंबईतील विविध मंदिरे, चौक आणि सार्वजनिक उद्यानांच्या सुशोभीकरणावर भर दिला असून त्यात ५० हून अधिक सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे. त्यापैकी अनेक कामे प्रगतीपथावर असून आठ ठिकाणांच्या सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत.
केवळ शहराच्या सौंदर्यीकरणच नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी उत्तर मुंबईत सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेतर्फे उत्तर मुंबईतील मंदिर, चौक, सार्वजनिक उद्याने, तसेच, खुली व्यायामशाळा (ओपन जिम) आदींचे सौंदर्यीकरण केले जात आहे. उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या खासदार निधीतून ही कामे पूर्ण केली जात आहेत.
नुकतेच कांदिवली (पश्चिम) येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे स्थानिक आमदार योगेश सागर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच, आतापर्यंत उत्तर मुंबईतील बोरिवलीतील कस्तुरपार्क, दहिसरमधील अंबावाडी बीट चौकी, प्रेम नगर, कांदिवलीतील गणपती मंदिर, स्वामी समर्थ मठ, शिवशंकर मंदिर, बोरिवलीतील आर. एम. भट्ट मार्ग चौक, गणेश दुर्गा माता मंदिर, गोराई झिरो सर्कल आदींच्या सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत.
गोयल यांच्या प्रयत्नांतून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना पक्की घरे उपलब्ध करणे, मतदारसंघातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांना वेग देणे, आरोग्य सुविधा वाढवणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे, अत्याधुनिक कौशल्य केंद्रांद्वारे कौशल्य व रोजगार सुविधा उपलब्ध करून देणे यासह नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.