बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्याने त्या रद्द करून नवीन नोटा आणणे हा प्रचंड खर्चिक उपाय ठरला आहे. त्या तुलनेत नोटांच्या अस्सलपणाची तपासणी करणाऱ्या यंत्राची सक्ती सरकारने किमान प्रत्येक दुकानदारास केली व तिच्या वापरास चालना दिली, तर बनावट नोटांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकणार आहे. सक्तीचा सुचविलेला पर्याय चांगला असून तो राज्यात अमलात कसा आणता येईल, याचा तातडीने विचार करण्यात येईल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. कायदेतज्ज्ञांसह मुंबई ग्राहक पंचायतीने या पर्यायाला पाठिंबा दर्शविला आहे.

सर्वसामान्यांच्या कष्टाच्या कमाईतही बनावट नोटा येत असल्याने व प्रत्येक बँकेच्या शाखेत त्या दररोज नष्ट केल्या जात असल्याने गोरगरिबांना मोठा फटका बसत आहे.

देशात साडेसहा कोटींच्या आसपास व्यापारी, दुकानदार व छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. जर त्यांनी नोटांचा अस्सलपणा तपासणी करणारे यंत्र विकत घेतले आणि त्यासाठी सरकारनेही ‘दुकाने व आस्थापना’ कायद्याद्वारे तशी सक्ती केली, तर बनावट नोटांचा प्रश्न कायमचा निकाली निघू शकतो. सरकार दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करते, दुकानदारांना वजनकाटा प्रमाणित करून घ्यावा लागतो, रिक्षा-टॅक्सीला प्रमाणित मीटरसक्ती असते, त्याच धर्तीवर प्रत्येक व्यावसायिक, व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार यांनी ही यंत्रे घेतली, तर बनावट नोटांची निर्मितीही थांबेल. सरकारला त्यासाठी खर्च नसून नोटा नष्ट केल्याने वाया जाणारा अब्जावधी रुपयांचा खर्चही वाचेल. सरकारने स्वस्तात ही यंत्रे उपलब्ध करून दिल्यास आणि बँका, रेल्वेस्थानके, रुग्णालये, शासकीय कार्यालये आदी सार्वजनिक ठिकाणी ती नागरिकांसाठी मोफत बसविल्यास त्यांनाही आपल्याकडच्या चलनी नोटा तपासता येतील. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नोटांचा खरेपणा तपासण्याच्या यंत्राच्या सक्तीचा पर्याय चांगला असल्याचे सांगून किमान राज्यात तरी त्याची अंमलबजावणी कशी करता येईल, याचा तातडीने विचार केला जाईल, असे सांगितले. व्यापाऱ्यांना व दुकानदारांना सरकारने सवलतीच्या किमतीत ही यंत्रे उपलब्ध करून दिल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो आणि बनावट नोटा चलनात येण्यापासून रोखल्या जाऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे व सल्लागार वर्षां राऊत यांनी या पर्यायाला पाठिंबा दर्शविला असून सरकारने तातडीने पावले टाकावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सरकारने याबाबत कायदेशीर सक्ती करावी आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेली अद्ययावत यंत्रे सर्वांपर्यंत कशी पोचतील, याची काळजी घेण्याची सूचना ज्येष्ठ वकील अनिल साखरे व अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी केली आहे.

  • देशात ५०० व हजारच्या नोटांचे चलनातील प्रमाण ८६ टक्के
  • नोटा रद्द केल्याने २२०३ कोटी ४० लाख नोटा चलनातून बाहेर जातील व नष्ट केल्या जातील
  • त्यांचे मूल्य १४ लाख १८ हजार कोटी रुपये
  • देशात दुकानदार व किरकोळ व्यापाऱ्यांची संख्या सुमारे पाच कोटी ५० लाख
  • व्हॅट भरणारे व्यापारी, दुकानदार सुमारे एक कोटी
  • दोन हजार रुपयांच्या नवीन नोटेच्या छपाईसाठी किमान तीन रुपये खर्च असून ५०० व एक हजारच्या नोटेसाठीही दीड-दोन रुपये खर्च आहे. या नोटा नष्ट केल्याने छपाईचे हजारो कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत.

नोटा तपासणी यंत्रांचे पर्याय

  • नोटांचा अस्सलपणा तपासणे व मोजणी यंत्र – किंमत सात हजार ५०० रुपयांहून अधिक
  • केवळ नोटांचा अस्सलपणा तपासणी यंत्र – किंमत किमान ११०० रुपयांहून अधिक
  • नोटांचा खरेपणा तपासण्यासाठी बॉलपेन – किंमत २०० रुपये या गोष्टी ऑनलाईनही खरेदी करता येतात.