मुंबई : अमली पदार्थांचा कुख्यात तस्कर समीर शेख उर्फ समीर ‘पाणीपुरी’ आता १५ वर्ष तुरूंगात असणार आहे. विशेष न्यायालयाने अमली पदार्थविरोधी गुन्ह्यात दोषी सिध्द झाल्यानंतर त्याला १५ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

माहीम येथे राहणारा समीर शेख उर्फ समीर पाणीपुरी (३२) हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात माहिम पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद आहे. अमली पदार्थांच्या तस्करीतही तो सक्रिय झाला होता. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे कक्षानेमाहिम दर्गा येथून त्याला १२ मे २०२५ रोजी अटक केली होती. त्याच्याकडे १६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ११० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ आढळले होते. त्याच्या विरोधात माहिम पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यातील (एनडीपीएस) विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात भक्कम पुरावे

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर यांनी या प्रकरणाच तपास केला होता. समीर पाणीपुरीविरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी भक्कम पुरावे, साक्षीदार सादर केले होते. त्याच्याविरोधात अमली पदार्थांसह विविध गुन्ह्यांतर्गत माहिम पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल असून समाजातीस त्याचा उपद्रव न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता.

१५ वर्ष कारावासाची शिक्षा

समीर पाणीपुरीवरील खटल्याची २२ ऑगस्ट रोजी विशेष सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आरोपी समीर पाणीपुरीविरोधात सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरले. पोलिसांनी केलेला तपास, पुरावे, साक्षीदार, जबाब आदींवरून समीर पाणीपुरीला दोषी ठरविण्यात आले. त्याला १५ वर्ष कारावास आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास ६ महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे.

या पोलिसांनी केली कारवाई

तत्कालीन पोलीस अधिकारी संजय चव्हाण, प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर, फिर्यादी पोलीस शिपाई अतुल सौदाणे यांनी तपास केला. रंगनाथ घुगे, मोहना आव्हाड, दिप्ती दरेकर,सुदक्षीना नेहे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.