मुंबई : कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई गणेशोत्सव काळात मुंबईत सक्रिय झाला आहे. गोरेगावमधील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला २५ लाखांच्या खंडणीसाठी विष्णोई टोळीतील एका गुंडाने फोन केला आहे. खंडणी न दिल्यास कुटुंबाला ठार मारण्याची धमकी या गुंडाने दिली. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करीत आहे.

गणेशोत्सव काळात मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कंबर कसलेली असताना कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडाने खंडणीसाठी केलेल्या फोनने खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीने नुकतीच हास्यअभिनेता कपिल शर्मा याच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार केला होता. त्याच्या तपासाचे धागेदोर जुळवत असताना या नव्या फोनने पोलिसांची चिता वाढवली आहे.

२५ लाख, १ किलो सोन्याची खंडणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील एका गुंडाने गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका मोठ्या व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन केला आहे. फोन करणाऱ्या गुंडाने २५ लाख रुपये आणि १ किलो सोन्याची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण केली नाही, तर व्यावसायिकासह संपूर्ण कुटुंबाला मारण्याची धमकी दिली आहे. घाबरलेल्या व्यावसायिकाने या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र त्याने लॉरेन्स बिष्णोई टोळीचे नाव घेतल्याने आम्ही या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

कोण आहे लॉरेन्स बिष्णोई ?

लॉरेन्स बिष्णोई हा हरियाणातील कुख्यात गँगस्टर असून पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि इतर उत्तरेकडील राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या बिष्णोई गँगचा तो प्रमुख मानला जातो. अभिनेता सलमान खानला दिलेली धमकी आणि त्याच्या घरावर केलेल्या गोळीबारामुळे तो चर्चेत आला होता.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या २०२२ मध्ये झालेल्या हत्येचा सूत्रधार म्हणून लॉरेन्स बिष्णोईचे नाव चर्चेत आले. पंजाबातील अनेक उद्योगपती, कलाकार व राजकारण्यांना खंडणीसाठी धमक्या दिल्याची प्रकरणे दाखल आहेत. त्याच्या नावावर ५० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत लॉरेन्स विष्णोईचा भाऊ अनमोल विष्णोई मुख्य सुत्रधार आहे. सध्या तो फरार आहे. लॉरेन्स विष्णोई टोळीचे प्रस्थ वाढत असल्याने त्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी त्याच्या रडारवर आहेत.