मुंबई : कांदबरीकार विश्वास पाटील हे मराठा आरक्षणप्रश्नी समाज माध्यमावर दिलेल्या मुलाखतीमध्ये जातीवाचक उल्लेख केल्याने जल्पकांकडून जोरदार टीका झाली होती. त्यानंतर पाटील यांनी आपल्या वक्तव्यासंदर्भात जाहीर दिलगिरी व्यक्त केली असून आपल्याला दलित विरोधी ठरवण्याचा काही पत्रकार-लेखकांचा प्रयत्न आहे, अशी सारवासारव केली आहे.
‘चार-पाच दिवसामागे मी हैदराबादच्या गॅझेट संदर्भात मुलाखत देताना माझ्या तोंडातील दोन वाक्य मोडतोड करून मला दलित विरोधी ठरविण्याचा प्रयत्न काही साहित्यिकांनी चालवला आहे. जे मी माझ्या वाट्याला आलेल्या दोन अनुभवाविषयी, ते सुद्धा परराज्यातल्या आमच्याच कृषक समाजातील दाखलाधारक अधिकाऱ्यांच्या अनुभवाबद्दल बोललो होतो. ज्यामध्ये मागास वर्ग किंवा अन्य कोणत्या जातीजमातीचा अधिक्षेप करण्याचा माझा स्वप्नातही विचार नव्हता. पण तरीही जर काही मंडळींना तसे वाटत असेल तर त्याबाबत जाहीर माफी मागण्यास मला काहीच दुःख वाटत नाही’, असे पाटील यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
‘माझे अण्णा भाऊ साठे यांच्याबाबतचे संशोधन माझ्या विरोधात राळ उठवू पाहणाऱ्या या गटातील कोणीही वाचलेले नाही. ‘क्रांतीसुर्य’ ही माझी पंचविशीच्या आत लिहिलेली कादंबरी असून ज्यामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि क्रांतिसिंह नाना पाटील हे दोघे स्वतःला एकमेकास बंधू कसे मानत, याविषयीचे चित्रण आहे. माझ्या “झाडाझडती” कादंबरीचे सशक्त दलित नायक खैरमोडे गुरुजी होते. माझा आरंभीचा साहित्यिक प्रवासच मुळी प्रा. केशव मेश्राम, सदा कराडे, सुहास सोनवणे आणि वामन होवाळ यांच्या सहवासात वृद्धिंगत झाला, असा दाखला पाटील यांनी दिला आहे.