देवनार पोलीस ठाण्यात दोन महिने उपक्रम यशस्वी
मुंबई पोलिसांच्या कामाची वेळ आठ तासांवर आणण्याच्या शक्यतेला आणखी बळकटी मिळाली आहे. देवनार पोलीस ठाण्यात तब्बल दोन महिने राबविलेला हा प्रयोग शहरातील १२ पोलीस ठाण्यांत राबविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या सर्व पोलीस ठाण्यांना महिन्याकाठी या योजनेच्या उपयुक्ततेचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबई शहरात पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. प्रत्येक पोलिसाला किमान १० तास कर्तव्यावर हजर राहावे लागते. परंतु, योग्य प्रकारे नियोजन केले तर पोलिसांच्या कामाचे तासही आठवर आणता येतील, असे आग्रही मत देवनार पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून मांडण्यात आले होते. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी देवनार पोलिसांना मे महिन्यात आठ तासांची एक पाळी राबविण्याची सूचना केली होती. गेले दोन महिने देवनार पोलीस ठाण्यात कामाचे तास कमी केल्याने झालेल्या बदलांचा सविस्तर अहवाल पोलीस आयुक्तांनी मागवून घेतला होता. देवनार पोलिसांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे पाहून एक पाऊल पुढे जात आयुक्तांनी प्रत्येक परिमंडळातील एका पोलीस ठाण्यात आठ तासांची डय़ुटी करण्याचे आदेश दिले आहेत.
याविषयी पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांना विचारले असता, देवनार पोलीस ठाण्याकडून मिळालेला प्रतिसाद खूपच चांगला आणि उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील प्रत्येक परिमंडळात एक अशा १२ पोलीस ठाण्यांत आता ही योजना राबविण्यात येत आहे.
या ठाण्यांत प्रयोग
एअरपोर्ट, भायखळा, चुनाभट्टी, देवनार, माटुंगा, डॉ. दा. भ. मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग, कफ परेड, गोराई, कुर्ला.