मुंबई : ५६०० कोटी रुपयांच्या नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि. (एनएसईएल) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने आतापर्यंत सात हजार ५३ गुंतवणूकदारांना ७९२ कोटींचे वाटप केले आहे. दहा लाख किंवा त्यापेक्षा कमी रक्कम असलेल्या गुंतवणूकदारांना शंभर टक्के रक्कम मिळाली असून दहा लाख रुपयांवरील गुंतवणूकदारांपैकी १५०० जणांना आतापर्यंत ३० टक्के रकमेचे वितरण झाले आहे.

एनएसईएलशी संबंधित आणखी अडीच हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव अपेक्षित असून त्यामुळे सहा हजारांहून अधिक मोठ्या गुंतवणूकदारांच्या पदरात गुंतवणुकीच्या ४५ टक्के रक्कम पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

२०१३ मध्ये उघड झालेल्या या घोटाळ्याची आर्थिक गुन्हे विभागासोबतच केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय चौकशी करीत आहे. तब्बल १२ वर्षे या प्रकरणाचा तपास सुरु असून आतापर्यंत आठ ते नऊ हजार कोटींची मालमत्ता हस्तगत करण्यात यश आले आहे. यापैकी काही मालमत्तांचा लिलाव झाला असून त्यापैकी ७९२ कोटी रुपयांचे वितरण मुंबई पोलिसांनी छोट्या गुंतवणूकदारांना केले आहे.

आर्थिक गुन्हे विभागात आर्थिक घोटाळ्याची अडीचशे प्रकरणे असून इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचे या तपासाशी संबंधित अधिकारी व सहायक पोलीस आयुक्त प्रकाश बागल यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरु झाला तेव्हा वागल हे पोलीस निरीक्षक होते. वरिष्ठ निरीक्षक व अलीकडे सहायक आयुक्तपदी बढती मिळाल्यानंतरही या घोटाळ्याचा तपास त्यांच्याकडेच आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापनाही करण्यात आली आहे.

एनएसईएलशी संबंधित कंपनीने एक रकमी तडजोड म्हणून १८५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय कंपनी विधी लवादाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाला ९० टक्क्यांहून अधिक गुंतवणूकदारांनी मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास दहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम असलेल्या गुंतवणूकदारांना ४५ टक्के रक्कम मिळण्याची शक्यता आहे. मात्र या प्रस्तावाला सक्तवसुली संचालनालयाने विरोध केला आहे. याशिवाय काही गुंतवणूकदारही या प्रस्तावाच्या विरोधात आहे. एनएसईएलच्या आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलावातून मिळणाऱ्या रकमेतून बुडालेली सर्व रक्कम वसूल होत असताना हा प्रस्ताव का मान्य करायचा, असा सवाल हे गुंतवणूकदार विचारत आहेत.

प्रत्यक्षात मालमत्ता नसतानाही एनएसईएल कंपनीकडून वस्तूंचे व्यवहार गुंतवणूकदारांच्या नकळत करण्यात आले. या द्वारे मिळालेली रक्कम भूखंड खरेदीत गुंतविण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईत ही माहिती उघड झाली होती. यापैकी अधिकाधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.