मुंबई : महानगरपालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर या वैद्यकीय महाविद्यालयांबरोबर उपनगरीय रुग्णालयांमधील परिचारिकांची अपुरी संख्या लक्षात घेऊन पालिकेने जूनमध्ये ६०० परिचारिकांची कायमस्वरुपी भरती केली. मात्र प्रशासनाने चार महिन्यांपासून या परिचारिकांना वेतनच दिलेले नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये असलेल्या परिचारिकांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असे. करोना काळामध्ये हा परिणाम अधिक प्रकर्षाने जाणवला. त्यामुळे वैद्याकीय महाविद्यालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांची भरती करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला. प्रशासनाने आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून जूनमध्ये विविध रुग्णालयांमध्ये ६०० परिचारिकांची भरती केली. परिणामी, पूर्वी कार्यरत असलेल्या परिचारिकांवरील कामाचा ताण कमी झाला. मात्र मागील चार महिन्यांपासून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नव्याने कायमस्वरुपी भरती केलेल्या ६०० परिचारिकांना वेतनच दिलेले नाही. चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे या परिचारिकांनी प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांचा कर्मचारी क्रमांक तयार झाला नसल्याचे तांत्रिक कारण देण्यात आले. तसेच पुढील दोन महिने वेतन होईल की नाही याची शाश्वतीही नसल्याचे परिचारिकांकडून सांगण्यात येत आहे. कर्तव्यावर रूजू झाल्यानंतर सलग चार महिने वेतन मिळू न शकल्याने परिचारिकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. तसेच पुढील दोन महिने वेतन मिळण्याची शक्यता नसल्याने कौटुंबिक आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न या परिचारिकांना पडला आहे.

हेही वाचा >>>Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त

सलग चार महिने वेतन न मिळाल्याने या परिचारिका संतप्त झाल्या आहेत. कर्मचारी क्रमांक तयार झाला नाही, यात प्रशासनाची चूक असून, त्यासाठी आम्हाला वेठीस का धरले जात आहे, असा प्रश्न परिचारिकांनी उपस्थित केला आहे. या परिचारिकांनी गेले चार महिने वेतन न मिळाल्याची बाब महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने मुबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना पत्र पाठवून त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

हेही वाचा >>>दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्यथा पुढील विचार

आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे समस्या मांडण्यात आली आहे. ते याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घेतील. ८ ते १० दिवसांमध्ये वेतन देण्याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास पुढील विचार करावा लागेल, असा इशारा महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी दिला.

पदरमोड करून पालिका रुग्णालयांत सेवामुंबई पालिकेच्या रुग्णालयात नुकत्याच भरती झालेल्या परिचारिकांना लवकरात लवकर कर्मचारी संकेतांक देण्यात येईल आणि त्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यात येईल. -किशोर गांधी, उपायुक्त सामान्य प्रशासन