मुंबई : आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर कुष्ठरोग निर्मूलनासाठी होणाऱ्या प्रयत्नांमधून नवीन कुष्ठरुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन वर्षात सातत्याने या शोध मोहिमेत कुष्ठरुग्णांची संख्या वाढत असून या कुष्ठरुग्णांसाठी उपचारादरम्यान पोषण आहार देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे. प्रतिकुष्ठरुग्ण ५०० रुपये पोषण आहार देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कुष्ठरोग निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर आग्रही प्रयत्न होत असले तरीही समाजामध्ये या आजारासंदर्भात असलेली भिती, गैरसमज यामुळे हा आजार आजही संपुष्टात आलेला नाही. करोना संसर्गानंतर या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. आरोग्यसेवा (कुष्ठरोग आणि क्षयरोग) विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार २०२१-२२ मध्ये १४,५२० कुष्ठरुग्ण आढळून आले. २०२२-२३ मध्ये यात वाढ होऊन १९,८६० कुष्ठरुग्णांच्या नोंदी करण्यात आल्या असून २०२३-२४ च्या डिसेंबरपर्यंतच्या शोधमोहीमेत २० हजार कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. नवीन शोधलेल्या रुग्णांचे प्रमाण हे अनुक्रमे ९.५५ टक्के, ११.१४ टक्के व १५.५८ टक्के एवढे आहे. नवीन शेधलेल्या कुष्ठरुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाणही मागील तीन वर्षांत वाढलेले आहे तर महिलांमधील नवीन रुग्णांच्या प्रमाणातही मोठी वाढ दिसते आहे. बहुतेक कुष्ठरुग्ण हे गरीब सामाजिक व आर्थिक स्तरावरील असल्यामुळे तसेच उपचारात सातत्य राहावे यासाठी या रुग्णांना उपचारादरम्यान पोषण आहार देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. कुष्ठरुग्णांपैकी मल्टीबॅसिलरी (एमबी) कुष्ठरुग्णांवरील उपचार हे १२ महिने केले जातात तर पॅसिबॅसिलरी रुग्णांवरील उपचार हे सहा महिने केले जातात.

हेही वाचा – रेडिओचा प्रसिद्ध आवाज हरपला, निवेदक अमीन सयानी यांचे निधन

शहरामध्ये पालिका क्षेत्रामध्ये तर ग्रामीण भागामध्ये विदर्भातील काही विशिष्ट भागामध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण वाढताना दिसते. कुष्ठरुग्णांना शोधून काढण्यासाठी राज्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली त्यामुळे अधिकाधिक रुग्णसंख्येची नोंद यामध्ये झाली आहे. ही मोहीम राबवली नसती तर रुग्णांची नोंद मोठ्या संख्येने झाली नसती, त्यामुळे रुग्णसंख्येच्या नोंदीमुळे धास्तावण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

रायगड, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, धाराशीव, अमरावती, यवतमाळ, भंडरा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा येथे दर दहा हजारी एपपेक्षा जास्त कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत तर नवीन शोधलेल्या कुष्ठरुग्णांचे प्रमाण दर एक लाख लोकांमागे १० पेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड, पालघर, धुळे, नंदुरबाहर, जळगाव, नाशिक,सातारा, परभणी, हिंगोली, धाराशीव, नांदेड, वाशीम, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे. रुग्णांनी नियमितपणे औषधोपचार घेतल्यास हा आजार निश्चितपणे बरा होत असल्यामुळे उपचारासाठी आरोग्य विभागाकडून सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून उपचारांअंतर्गत असलेल्या रुग्णांसाठी पोषण आहार योजना सुरु करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबईतील तापमानात घट होण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र हे आरोग्य विभागाचे उद्दिष्ठ असून यासाठी रुग्णशोध मोहीम घरोघरी जाऊन राबविण्याबरोबरच उपचारामुळे हा आजार बरा होऊ शकतो हा विश्वास आम्ही देत आहोत. सासत्याने रुग्णशोध मोहीम राबविण्यात येत असल्यामुळे आकडेवारी जास्त दिसत असून यामुळेच कुष्ठरोग निर्मूलनाचा उद्देश साध्य होण्यास मदत होणार आहे. यात अनेक रुग्ण हे गरीब वर्गातील व स्थलांतरित कष्टकरी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा वर्गासाठी औषधोपचाराबरोबरच पोषण आहार देणे आवश्यक असल्याची भूमिका घेऊन पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला आहे. – आरोग्यमंत्री तानाजी सावंत