दिवसभर संभ्रम, धास्ती आणि अखेरीस सुटकेचा नि:श्वास
अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि मुंबईच्या दिशेने येणारे ओखी चक्रीवादळ गुजरातकडे वळल्यामुळे दिवसभर घोंगावणारे संभ्रम आणि धास्तीचे ढग विरत गेले आणि सायंकाळी राज्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वादळाचे संकट टळले असले तरी मुंबई, ठाणे, पालघरबरोबरच राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. पावसामुळे काही शाळा बंद होत्या तर काही शाळांचे प्राथमिकचे वर्ग बंद होते. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मात्र सुरळीत पार पडल्या. पुढील दोन दिवस मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कुलाबा केंद्राने मंगळवार सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यत ७३.६ मिमी पावसाची नोंद केली आहे, तर सांताक्रुझ येथे ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईपासून १६० किलोमीटर असणारे हे वादळ ताशी १७ किलोमीटर वेगाने गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीकडे सरकले असून मंगळवारी मध्यरात्रीपर्यत सुरतजवळ स्थिरावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
वादळी पावसाच्या पूर्वसूचनेमुळे अनेक नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घरीच थांबणे पसंत केले. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या ठाणे शहरातील रस्त्यांवर मंगळवारी वाहनांची वर्दळ कमी होती. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागांतही अशीच काहीशी परिस्थिती होती. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्य़ात ठिकठिकाणी पाऊस पडत असला तरी पाणी साचण्याचे प्रकार मात्र घडले नाहीत. असे असले तरी या पावसामुळे रेल्वे सेवेवर काही प्रमाणात परिणाम झाला. दोन दिवसांपासूनच उपनगरी गाडय़ा काही वेळ उशिराने धावत होत्या.
वादळी पावसाने पालघर जिल्ह्य़ात शेतकरी, मच्छीमार यांचे नुकसान झाले. जिल्ह्य़ातील पालघर, डहाणू, वसई या किनारपट्टीवरील तालुक्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. वसई पूर्वेच्या ग्रामीण भागात २० तासांपेक्षा अधिक वेळ वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. अर्नाळा गावात वादळी वाऱ्यांमुळे घरांची पडझड झाली, तर काही भागांत झाडे उन्मळून पडली.
पालघरजवळ एका मच्छीमार बोटीला जलसमाधी मिळाली असून अन्य बोटी माघारी परतवाव्या लागल्या. पावसामुळे पालघर, रायगड आणि रत्नागिरीतील मासेमारी बंदच होती.
गुजरात निवडणुकांना बाधा नाही
ओखी वादळाचा जोर ओसरत असल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीवर त्याचा काही परिणाम होणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव संजीव कुमार जिंदाल यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगानेही मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्थानिक प्रशासनाने पूर्ण काळजी घ्यावी, अशी सूचना मंगळवारी केली. अर्थात या वादळाच्या धास्तीने भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांच्या मंगळवारच्या प्रचारसभा मात्र रद्द केल्या गेल्या.
..मात्र शेतीला फटका
या पावसाने कोल्हापूर, नाशिक येथील कांदा उत्पादक आणि द्राक्ष बागायतदारांना फटका बसला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्य़ातील मासेमारीही बंद असल्याने मच्छिमारही चिंताग्रस्त आहेत. पुढील २४ तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने भाजीपाला आणि अन्य पिकांचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम शेतमालाच्या बाजारपेठेवर होण्याची मोठी शक्यता आहे. शेतातला तयार कांदा भिजल्याने तो सडण्याची वा त्याच्या दर्जावर परिणाम होण्याची धास्ती आहे. पावसाळी हवामानामुळे कांद्यावर करपा व फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका व्यक्त केला जातो. रब्बी ज्वारी, करडई, भाजीपाला, मिरची, डाळिंब, द्राक्ष आदी पिकांवरही रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
१६७ बेपत्ताच
वादळी पावसाने केरळ आणि तामिळनाडूतला कहर कायम असून त्यात ३९ जण मृत्युमुखी पडले आहेत तर १६७ मच्छिमार अद्याप बेपत्ताच आहेत. ८०९ मच्छिमार हे प्रवाहाच्या जोराने महाराष्ट्रात वाहात गेले असून ते सुखरूप आहेत. लक्षद्वीप येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या १८४ मच्छिमारांची सुटका करण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. तटरक्षक दलाने ओखी वादळात विविध ठिकाणच्या समुद्रात अडकलेल्या ३६७ जणांची सुखरूप सुटका केली आहे.
परीक्षा सुरळीत: वादळाच्या धास्तीने शाळांना मंगळवारी सुट्टी दिल्यानंतर विद्यापीठांच्या परीक्षांबाबत पसरलेला संभ्रम, त्यातच सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर असा गोंधळ मंगळवारी विद्यापीठाच्या परीक्षांदरम्यान झाला. मात्र तरी परीक्षा सुरळीतपणे झाल्या. विद्यार्थ्यांकडून कोणत्याही तक्रारी आल्या नसल्याचे जनसंपर्क अधिकारी विनोद माळाळे यांनी सांगितले.
जलवाहतूक बंद
वादळ आणि पावसाने सलग दुसऱ्या दिवशी मुंबई ते मांडवा आणि भाऊचा धक्का ते रेवस दरम्यान चालणारी प्रवासी जलवाहतूक बंद ठेवण्यात आली, त्यामुळे पर्यटक आणि दैनंदिन प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.