मनोज पाटीलने आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केल्यानंतर साहिल खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या मनोज पाटील यांच्या आरोपानंतर आता अभिनेता साहिल खान आपली बाजू मांडणार आहे.

official-statement-from-sahil-khan-regarding-manoj-patil-suicide-attempt-case-gst-97
अभिनेता साहिल खानची पहिली प्रतिक्रिया (Photo : File)

मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यावेळी, अभिनेता साहिल खान याने आपल्याला अनेक दिवस मानसिक त्रास दिल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप देखील मनोज पाटील याने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला. या आरोपानंतर मोठी खळबळ उडालेली असतानाच आता अभिनेता साहिल खान याची पहिली प्रतिक्रिया आहे. “मनोज पाटील प्रकरणात माझं नाव नेमकं का आलं? याबाबत मला स्पष्टीकरण द्यायचं आहे. मला पुराव्यांसह या प्रकरणातील सत्य सर्वांसमोर ठेवायचं आहे”, असं साहिल खान याने सांगितलं आहे. आज (१६ सप्टेंबर) संध्याकाळी ७.३० वाजता जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपण या प्रकरणाचा खुलासा करणार असल्याचं साहिल खान याने सांगितलं आहे.

“मनोज पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात माझं नाव घेण्यात येत आहे. म्हणूनच, मला आता माझी बाजू सर्वांपुढे मांडायची आहे. मी पुराव्यासह या प्रकरणाचं सत्य आणि यात माझं नाव नेमकं आणलं जातं आहे यामागचं सत्य सांगणार आहे. त्यानंतर देखील जर कोणाला माझं हे स्पष्टीकरण आणि पुरावे पटले नाहीत तर कायदेशीर मार्गानेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी. परंतु, ह्यात जर इतर कोणी चुकीचं सिद्ध झालं तर त्याच्यावरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे”, असं साहिल खान याने म्हटलं आहे.

वादात ‘मनसे’ची उडी

मनोज पाटील आणि साहिल खान यांच्या या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. “साहिल खान जर २० सप्टेंबरला मनसे कार्यालयात आला नाही तर त्याला त्या पद्धतीचा इशारा देण्यात येईल”, असा इशारा मनसेने दिला आहे. त्याचसोबत, मनोज पाटील यांच्या मित्रांना आज मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि चित्रपट सेनेचे सरचिटणीस अमेय खोपकर यांनी “बॉडी बिल्डर मनोज पाटील याला न्याय नक्की मिळेल”, असा विश्वास देखील दिला आहे.

त्रास आणि बदनामीमुळे आत्महत्येचं पाऊल

मनोज पाटीलने बुधवारी (१५ सप्टेंबर) रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप देखील मनोज पाटीलने केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं मनोज पाटीलने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

व्यावसायिक आणि इतर वादही

मिस्टर इंडिया असलेला मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता. साहिल खानलाही या स्पर्धेत उतरायचं होतं. यामुळेच साहिल खान आपण स्पर्धेत सहभागी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा आरोप मनोज पाटील याने केला आहे. याशिवाय व्यावसायिक तसंच इतर वादही होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Official statement from sahil khan regarding manoj patil suicide attempt case gst