ओला आणि उबरच्या टॅक्सी चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यातील ओलाच्या चालकांनी बुधवारी संध्याकाळी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. पण उबरच्या चालकांनी संप चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपाचा आजचा चौथा दिवस आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला आहे. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अॅपबेस टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला आणि उबर या दोन्ही कंपन्या अल्पावधीत महत्वपूर्ण ठरल्या आहेत.

आज बुधवारी ओला कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत अंधेरीमध्ये बैठक झाली. उद्या उबरच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे असे मनसेच्या वाहतूक शाखेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी सांगितले. या संपात मुंबईतील ओला आणि उबरचे ९० ते ९५ टक्के चालक सहभागी झाले होते असे संजय नाईक यांनी सांगितले. अत्यंत कमी नफा मिळत असल्याच्या विरोधात हे चालक संपावर गेले आहेत. संपात सहभागी न होता गाडया काढणाऱ्या ओला-उबरवर दगडफेक केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.

कारचे नुकसान केल्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत विविध भागातून १५ जणांना अटक केली आहे. मुंबई आणि पुण्यातील बहुसंख्य चालकांनी संपातून माघार घेतल्याचा दावा उबरने केला आहे. एकटया मुंबईमध्ये ४५ हजारपेक्षा जास्त अॅप बेस टॅक्सी चालतात असा अंदाज आहे. ओलाचे चालक आज मध्यरात्रीपासून कामावर परतणार असल्याने मुंबईकरांना दिलासा नक्कीच मिळेल. या संपामुळे रोजची ओला-उबरने कामावर जाणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.