मुंबई : मरीन लाईन्स स्थानकाजवळील चिराबाजार परिसरात प्रभू गल्ली येथे संध्याकाळी साडेसात वाजता इमारत कोसळली. जिन्याचाच भाग कोसळल्याने रहिवासी इमारतीतच अडकले.

गिरगाव येथील प्रभू गल्ली येथील इमारत क्र. १४/१६ चा काही भाग आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कोसळला. इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळल्याने रहिवाशांना बाहेर पडण्यात मोठी अडचण निर्माण झाली. स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दल, पोलीस, १०८ ॲम्ब्युलन्स तसेच मनपा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तळमजला अधिक दोन मजली इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे रहिवासी दुसऱ्या मजल्यावर अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदतकार्य हाती घेण्यात आले होते.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इमारतीत एकूण १७ रहिवासी होते. त्यापैकी दोघांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

ही इमारत अतिशय जुनी होती व या इमारतीच्या शेजारी असलेल्या इमारत क्र. १८/२० व २०/२२ या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम नुकतेच सुरू झाले होते. जुन्या इमारती तोडताना बसलेल्या हादऱ्यांमुळे ही इमारत कमकुवत झाली व तिच्या जिन्याचा भाग कोसळल्याची शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली आहे.