मुंबई: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीनिमित्त घराघरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्षांनीही दिवाळीनिमित्त रस्ते, गल्ली, नाके आणि चौकाचौकात कंदील लावण्याची लगबग सुरू केली आहे. शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील अनेक भागांमधील शिवसेनेच्या आकाश कंदिलांची जागा भाजपने घेतली असून यंदा काही ठिकाणी शिंदे गटाचे कंदील दिसण्याची शक्यता आहे.

मात्र, असे असले तरीही कंदिलांच्या मांदियाळीत मनसेने मात्र आपले स्थान पक्के ठेवले आहे. परिणामी, दरवर्षीप्रमाणे यंदाही राजकीय आकाश कंदिलाची बाजारपेठ तेजीत असून राजकीय पक्षांमध्ये कंदील झळकविण्याची चुरसच लागल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर मुंबईत साकारलेले आकाश कंदील नागपूरमध्येही पाहायला मिळणार आहेत.

दिवाळी म्हटली की लखलखणारे दिवे, खमंग फराळ, सुबक रांगोळी आणि झगमगते रंगीबेरंगी आकाश कंदील. दिवाळीनिमित्त घराबाहेर सुबक रांगोळी काढून दिव्यांची आरास केली जाते. यात भर पडते ती आकाश कंदिलाची. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाप्रमाणेच राजकीय पक्ष, नेते मंडली राजकीय कंदील झळकवून प्रसिद्धीची संधी साधत असतात. त्याचबरोबर उटणे, फराळ, दिवे आणि रांगोळीचे वाटप करून प्रसिद्धी मिळविण्याची धडपड करीत असतात. मागील अनेक वर्षांपासून बाजारात, गल्ली, नाक्या – नाक्यावर, चौकाचौकात आकाश कंदील लावण्यासाठी राजकीय पक्षांची जणू स्पर्धाच लागलेली आहे.

हेही वाचा… थकहमी योजना बासनात; साखर कारखान्यांना कर्ज देण्यास राज्य बँकेचा नकार

भलेमोठे कंदील बनवणे हे अत्यंत अवघड, कौशल्याचे आणि संयमाचे काम आहे. राजकीय कंदील तयार करणाऱ्यांमध्ये महादेव साळसकर, सदानंद जठाळ, सहदेव नेवाळकर, सावंत बंधू आदी मात्तबर मंडळी होती. ज्यांनी राजकीय कंदील बनवल्यास सुरुवात केली. या मंडळींनी तयार केलेले कंदील मुंबईत जागोजागी पाहायला मिळत होते. त्यावेळी केवळ शिवसेनेच्या कंदिलांचा बोलबाला होता. मात्र, नंतरच्या काळात विविध पक्षांचेही आकाश कंदील दिसू लागले. त्यामुळे राजकीय कंदील तयार करणाऱ्यांची संख्याही वाढली. शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि राज्यात राजकीय घडामोडी घडल्यानंतर शिवसेनेचे कंदील लागत असलेल्या ठिकाणी भाजपचे कंदील दिसू लागले. यंदा अनेक ठिकाणी शिंदे गटाचे कंदिलही दिसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजकीय कंदिलांच्या बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने आखडता हात घेतला आहे.

मागील वर्षी मनसेने चौकाचौकात, रस्त्यांवर जवळपास १०० कंदील लावले होते. शिवाय मनसेने शिवाजी पार्कमध्ये आयोजित केलेला दीपोत्सव लक्षवेधी ठरला होता. यंदा मनसेच्या कंदिलांच्या मागणीत जवळपास ३० ते ४० ने भर पडली आहे. तसेच भाजपनेही मागील वर्षीच्या तुलनेत अधिक कंदील लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याच वेळी शिवसेनेच्या (ठाकरे गट) कंदिलांच्या मागणीत यंदा मोठी घट झाली असून मागील वर्षी जवळपास ८० कंदिल शिवसेनेने शहरात लावले होते. मात्र, यंदा तुलनेत शिवसेनेचे कंदील कमी असण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कंदिलांच्या मागणीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक मोठा कंदील तयार करण्यासाठी किमान दोन दिवस लागतात. एकूण चार जणांचे त्यामागे कष्ट असतात. पूर्वी भाजपकडून एकाही कंदिलाची मागणी येत नव्हती, मात्र, मागील काही वर्षात सर्वाधिक कंदील भाजपसाठी बनविण्यात येत आहेत. परिणामी, कंदील निर्मितीतून मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. मागच्या वर्षी नागपुरवरूनही भाजपसाठी कंदिलांची मागणी आली होती. यंदाही नागपूरमधून कंदिलांच्या मागणीत चांगली वाढ झाली आहे. मुंबईहून नागपूरला जवळपास ३८ कंदील पाठविण्यात येणार आहेत, असे कंदिलांचे व्यापारी प्रकाश (नाना) जठाळ यांनी सांगितले.