scorecardresearch

शिवजयंती निमित्त राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिली शपथ, म्हणाले…

शिवाजी पार्कवरील शिवजयंती सोहळ्यास लावली हजेरी

(संग्रहीत छायाचित्र)

राज्यभरात आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत शिवाजी पार्कवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या सोहळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित असलेल्या तमाम मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि एक शपथ देखील दिली.

“मी आज आपल्याला सर्वांना शिवजयंतीच्या निमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी इथे शिवजयंतीच्या निमित्त मी आपल्या सर्वांना एक पक्षा तर्फे शपथ देणार आहे. ती शपथ तुम्ही माझ्या बरोबरीने बोलायची आहे.” असं राज ठाकरे यांनी सांगितलं आणि शपथ वाचण सुरू केलं.

राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिलेली शपथ –

“आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतो की, स्वराजाच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्य व्हावं, म्हणून सर्वजण प्रयत्नांची पराकाष्टा करू. हे सुराज्य स्थापन करताना जाती-जातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान राहील, युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल, इथलं प्रत्येक मूल शाळेत जाऊन शिकत असेल, लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळेल. इथली शहर-गावं-पाडे-तांडे सुंदर, सुकर आणि सुरक्षित असतील. भ्रष्टाचार नष्ट होईल आमच्या शेतकरी बंधू-भगिनींना त्यांच्या शेतमालाल योग्य भाव मिळेल. कामगारांना न्याय मिळेल. यासाठी जे पडेल ते करू. छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी, स्वावलंबी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू. आम्ही महाराजांचे मावळे आहोत, सैनिक आहोत याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही. हे वचन देवून आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होवून, आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो.” अशा शब्दांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती निमित्त मनसे कार्यकर्त्यांना शपथ दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: On the occasion of shiv jayanti raj thackeray gave oath to mns workers msr

ताज्या बातम्या