राज्यात दररोज तीन ते चार भ्रष्ट अधिकारी रंगेहाथ पकडले जात असल्यामुळे सर्वच विभागांनी गंभीर दखल घेतली असून मुंबई पोलिसांनीही त्या दिशेने योजना तयार केली आहे. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना त्यांच्या अखत्यारीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची स्वतंत्र यादीच तयार करण्याचे आदेश आयुक्त राकेश मारीया यांनी दिले आहेत. या भ्रष्ट अधिकाऱ्यांना एकदा तंबी दिली जाणार असून तरीही त्यांच्यामध्ये सुधारणा न झाल्यास त्यांच्याविरुद्ध बदली वा तत्सम कारवाई केली जाणार आहे.
राज्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध उघडलेल्या आघाडीची सर्वच पातळीवर गंभीर दखल घेतली जात आहे. पोलीस आयुक्त मारीया यांनी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची खास बैठक बोलावून भ्रष्ट अधिकाऱ्यांना आळा घालण्याबाबत स्वतंत्र योजना तयार केली आहे.
या योजनेनुसार पोलीस ठाण्यातील तसेच सहायक आयुक्त कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. या यादीतही ‘टॉप टेन’ भ्रष्ट अधिकारी असतील. त्यांना सुधारण्याची एकदा संधी दिली जाणार आहे. अन्यथा ही यादी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली जाणार आहे. या अधिकाऱ्यांना वचक बसावा, असा या मागचा हेतू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
 एखाद्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी लाच घेताना आढळला तर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाला दोषी धरले जाणार आहे. मात्र वरिष्ठ निरीक्षकच लाच घेताना अटक पकडला गेला तर त्याच्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेतही आयुक्तांनी दिले आहेत.

nepali security guard robs home
nepali security guard, robs home,
नेपाळी सुरक्षा रक्षकांनी घर लुटले
प्रतिनिधी, मुंबई<br />इमारतीच्या सुरक्षा रक्षकांनीच बनावट चावीने एका घरातील दागिने लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. चारकोप येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
चारकोप येथील केसरी अपार्टमेंट मध्ये राहणारे सनी डिसोजा हे मंगळवारी बाहेर गेले होते. सायंकाळी ते घरी परतले असता घरातील दागिने आणि रोख रक्कम असा दोन लाखांचा ऐवज गायब असल्याचे आढळून आले.अज्ञात चोरांनी बनावट चावीने घरात प्रवेश करून ही चोरी केली होती. याप्रकरणी डिसोजो यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलीस तपासात इमारतीचे चार नेपाळी सुरक्षा रक्षक शेरसिंग, रमेश सिंग, राम सिंग आणि मान सिंग हे गायब असल्याचे समजले. त्यांचे मोबाईल क्रमांकही बंद होते. या सुरक्षा रक्षकांनीच बनावट चावी बनवून ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
उल्हासनगरमध्ये पत्नीचा खून, पतीची आत्महत्या
कल्याण : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या दारूडय़ा पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला. नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उल्हासनगरमध्ये उघडकीला आला.
सचिन लक्ष्मण शिंदे (२८), सुरेखा (२६) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. उल्हासनगरमधील संभाजी चौकातील धानोरे चाळीत राहणाऱ्या या सचिनचे दोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्याला दारूचे व्यसन होते. तो सतत पत्नी सुरेखाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ, मारहाण करीत होता. या वादातून सचिनने आपल्या मुलीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची तक्रार मुलीच्या आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती सचिनने एका हॉटेलच्या पोटमाळ्यावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीला आला.
पारसिक बोगद्यातील दिवे चोरणाऱ्या चौकडीस अटक
ठाणे : मध्य रेल्वेच्या जलद गती मार्गावरील पारसिक डोंगरातील बोगद्यातील विजेचे दिवे चोरणाऱ्या चौकडीस रेल्वे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. इम्रान खान (२५), गुड्डू खान (२०) आणि मिर्झा अब्दुल्ला (२२)  आणि चोरलेले दिवे विकत घेणारा भंगार विक्रेता कल्लू शेख अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुमारे दीड किलोमिटर लांबीच्या पारसिक बोगद्यात १४२ दिवे आहेत. त्यापैकी साठ दिवे चोरीस गेल्याने बोगद्यात बऱ्याच ठिकाणी अंधार पसरला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने याविषयी तपास करून मंगळवारी भंगार विक्रेत्यास आणि त्याने दिलेल्या माहितीवरून बुधवारी तिघा चोरांना जेरबंद केले.