मुंबई : ऑन्कोपॅथोलॉजी क्षेत्रात भारतातीलच नव्हे तर जगभरातील डॉक्टरांसाठी दीपस्तंभ बनलेल्या प्रसिद्ध डॉ. अनिता बोर्जेस (७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दादर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. अनिता बोर्जेस या गाेरखपूर येथील कर्करोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र प्रशिक्षणाच्या आदल्या दिवशी रात्रीच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. डॉ. बोर्जेस यांचे पार्थिव गुरुवारी रात्री दिल्लीला आणि तेथून शुक्रवारी रात्री मुंबईला आणण्यात आले. डॉ. बोर्जेस यांच्या निधनाने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट आणि कर्करोग सर्जन डॉ. अर्नेस्ट बोर्जेस यांची कन्या अनिता बोर्जेस यांनी पॅथॉलॉजी क्षेत्रात मागील पाच दशकांहून अधिक काळ भरीव कार्य केले आहे. टाटा रुग्णालय, एस. एल. रहेजा रुग्णालय आणि मुंबईतील सेंटर फॉर ऑन्कोपॅथॉलॉजी येथे अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केले. भारतीय हेड अँड नेक ऑन्कोलॉजिस्ट सोसायटीतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या अचूक आणि स्पष्ट निदान अहवालांमुळे देशभरातील हजारो कर्करुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळू शकले. पॅथॉलॉजिस्टमध्ये त्यांचा शब्द अंतिम समजला जात असे.

डॉ. बोर्जेस यांना तरुण विद्यार्थ्यांना शिकविण्यामध्ये फारच रस होता. त्यांच्याकडे शिक्षण घेतलेला विद्यार्थी आज जगभरामध्ये नावारुपाला आले आहेत. कर्करोगाच्या रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील असलेल्या बोर्जेस यांनी देशातील विविध भागांमधील रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांना भेट देऊन तेथील डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. गोरखपूरमधील एका परिषदेमध्ये शुक्रवारी तरुण डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी त्या गेल्या होत्या. तेथेच हृदयविकाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे सहकारी आणि पॅथॉलॉजी प्राध्यापक डॉ. सुमीत गुजराल यांनी दिली.

पाच दशकांहून अधिक अनुभव असलेल्या डॉ. बोर्जेस २००४ मध्ये टाटा रुग्णालयामधून प्राध्यापक आणि सर्जिकल पॅथॉलॉजी प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. सध्या त्या हिस्टोपॅथॉलॉजीमधील एसआरएल-डी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या संचालक होत्या आणि माहीम येथील एस.एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये हिस्टोपॅथॉलॉजी प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यामध्ये त्यांनी अनेक संस्थांमध्ये काम करताना कोणतेही मानधन न घेता मोफत रुग्णांची सेवा केली आहे. नायर रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९७८ मध्ये लंडनमधील रॉयल मार्सडेन आणि १९८० मध्ये न्यू यॉर्कमधील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर सारख्या आघाडीच्या केंद्रांमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले होते.

शोकसभेचे आयोजन

डॉ. अनिता बोर्जेस यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात शोकसभा आयोजित केली आहे. शोक सभेसाठी सकाळी ९:४५ पर्यंत उपस्थित राहण्याची विनंती कुटुंबियांनी केली आहे.