मुंबई : पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून ‘एक गाव एक गणपती’ मोहीम राबवायला हवी अशी भूमिका पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली आहे. मात्र मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना ही भूमिका मान्य नाही. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पर्यावरणमंत्र्यांना पत्र पाठवून आपले मत कळवले आहे. ‘एक गाव एक गणपती’ ही मोहीम मुंबईत शक्य होणार नाही. गावातील विषय हा गावापुरता मर्यादित ठेवा, शहरासाठी ते लागू होणार नाही, असेही समन्वय समितीने आपल्या पत्रात म्हटले आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) साकारण्यात येणाऱ्या मूर्तींचा विषय सध्या गाजत असून उच्च न्यायालयाने पीओपीच्या मूर्तींना बंदी घातली आहे. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये संतापाचे वातावरण असून गणेशोत्सव मंडळेही संभ्रमात आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत आपली भूमिका ‘लोकसत्ता’च्या लोकसंवाद कार्यक्रमात स्पष्ट केली होती. मात्र पंकजा मुंडे यांचे मत मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना मान्य नाही.

या संदर्भात समन्वय समितीने पर्यावरण मंत्र्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात समन्वय समितीने म्हटले आहे की, गणेशोत्सवात प्लास्टिक व थर्माकोलचा भरमसाट वापर होतो या मताशी आम्ही सहमत नाही. चार वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने थर्माकोलबाबत निर्णय दिल्यानंतर गणेशोत्सवात थर्माकोल बंदीची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली. लहान – मोठे व्यावसायिक प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यावर पर्यावरण विभागाकडून वर्षभारात किती कारवाई करण्यात आली याबाबत माहिती देण्याची मागणीही समितीने केली आहे.

मंत्र्यांना समितीचा सल्ला

‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना मुंबईत राबवणे शक्य होणार नाही, असेही मत समन्वय समितीने व्यक्त केले आहे. समितीने पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायदा १९५० अन्वये मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे नोंदणीकृत आहेत. त्यात दिलेल्या तरतुदींचे मुंबईतील गणेश मंडळे पालन करीत आहेत. मुंबईतील गणेश मंडळे गेली १०० वर्षांहून जुनी आहेत.

मुंबईतील वेगवेगळ्या विभागात ही मंडळे असून ती अधिकृत व नोंदणीकृत आहेत. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांकडून वर्षभर सामाजिक उपक्रम, तसेच धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. आपत्कालीन परिस्थितीत हीच मंडळे गावात जाऊनही आर्थिक, तसेच प्रत्यक्ष मदत करत असतात. मुंबईतील गणेशोत्सव मंडळे राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती आपण करून घेतल्यास बरे होईल, असाही सल्ला समन्वय समितीने मंत्र्यांना दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरण मंत्र्यांचे म्हणणे काय ?

गणेशोत्सवात प्लास्टिक आणि थर्माकोलचा भरमसाट वापर होतो. सर्वोच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीवर बंदी घातली आहे. पीओपी ही माती आहे, या मूर्तिकारांच्या म्हणण्यात अजिबात तथ्य नाही. खरे तर सर्वत्र ‘एक गाव एक गणपती’ मोहीम राबवायला हवी. पण आपल्याकडे कशाचेही राजकारण होते.