महानगरपालिकेच्या जलतरण तलावांचे सदस्यत्व आता ऑनलाईन मिळणार आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते या ऑनलाईन प्रक्रियेचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या यंत्रणेमुळे पोहोणाऱ्यांची संख्या घरबसल्या कळणार, ज्यामुळे पोहायला जाण्याचे वेळापत्रक ठरवणे शक्य होणार आहे. जलतरण तलावांच्या सदस्यांसाठी पोहोण्याच्या कालावधीत १५ मिनिटांची वाढ करण्यात आली असून सर्वांसाठी १ तासाचा कालावधी देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण तलावांमध्ये पोहायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच तलावांमध्ये पोहोण्यासाठी सदस्यत्व मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक इच्छुक असतात. मात्र, यापूर्वी छापील अर्ज भरुन हे सदस्यत्व दिले जात होते. त्यामुळे पालिकेने ही प्रक्रिया आता ऑनलाईन केली आहे. या पद्धतीचा मंगळवारी शुभारंभ झाला. महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला उपायुक्त किशोर गांधी, संचालक (माहिती व तंत्रज्ञान) शरद उघडे, समन्वयक संदीप वैशंपायन यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठाच्या पेटसाठी साडेचार हजार अर्ज २६ आणि २७ ऑगस्ट रोजी

पहिल्या टप्प्यात ज्या ४ जलतरण तलावांची सदस्यत्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत आहे, त्यामध्ये दहिसर परिसरातील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव येथील प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बुधवारपासून चेंबूर (पूर्व) येथील ‘जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव’(ऑलिंपिक) आणि कांदिवली परिसरातील ‘सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव’(ऑलिंपिक) या दोन्ही जलतरण तलावांची सदस्यत्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे. दादर परिसरातील महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलावाची ऑनलाईन सदस्यत्व नोंदणी गुरुवार दिनांक २५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या चारही तरण तलावांसाठी एकूण ६ हजार व्यक्तींना ऑनलाईन पद्धतीने सदस्यत्व नोंदणी दिली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त किशोर गांधी यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर जलतरण तलाव वार्षिक सदस्यत्व नोंदणीची ‘लिंक’ देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन अर्ज आहे.दादर, कांदिवली व चेंबूर येथील जलतरण तलावांचे वार्षिक सदस्यत्व शुल्क हे रुपये १० हजार १०० इतके आहे. तर दहिसर येथील जलतरण तलावांचे वार्षिक सदस्यत्व शुल्क हे ८ हजार रुपये इतके आहे. या शुल्कामध्ये शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक इत्यादींना वार्षिक शुल्कामध्ये ५० टक्के मिळणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online membership for municipal swimming pools mumbai print news amy
First published on: 23-08-2022 at 20:23 IST