मुंबई: पहलगाम हल्ला व त्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. अशा परिस्थिती युद्ध झाल्यास देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बुधवारी मुंबईतील नागरी संरक्षण विभागाच्या मुख्यालयात संरक्षण क्षमतेची चाचणी (माॅकड्रिल) करण्यात आला. सुमारे हजार स्वयंसेवक या सरावात सहभागी झाले होते. त्यात अग्निशमन दल, पोलीस, एनडीआरएफ यांसारख्या यंत्रणाही सहभागी झाल्या होत्या. ऑपरेशन अभ्यास अंतर्गत हे मॉकड्रील करण्यात आल्याचे नागरी संरक्षण विभागाचे संचालक प्रभात कुमार यांनी सांगितले.
मुंबईतील क्रॉस मैदान येथे नागरी संरक्षण विभागाचे राज्याचे मुख्यालय आहे. त्या इमारतीच्या शेजारी असलेल्या मैदानात बुधवारी दुपारी चार वाजता नागरी संरक्षण विभागाकडून स्वयंसेवकांसह मॉकड्रील करण्यात आले. त्या अभ्यासात सुमारे एक हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्यात एनसीसी व एनएनएसच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.
इमारतीवर युद्धात हल्ला झाल्याची परिस्थितीनागरी संरक्षण विभागाच्या इमारतीवर हल्ला व बॉम्बस्फोट झाल्यामुळे आग लागल्याचे चित्र उभे करण्यात आले होते. त्यावेळी नागरी संरक्षण विभागातील स्वयंसेवींनी त्यांना शिकवलेल्या पद्धतीने लोकांना तेथून बाहेर काढले, तसेच जे जखमी होते. त्यांना इमारतीच्या छतावर नेऊन तेथून खाली सुरक्षीत उतरवून रुग्णालयात नेण्याचा सराव करण्यात आला. याशिवाय युद्धजन्य परिस्थितीत घटनांनुसार कसे भोंगे वाजतात याचीही माहिती देण्यात आली. या सरावादरम्यान नियंत्रण कक्षाकडून सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले.
त्यानंतर एनडीआरएफ, महापालिका, पोलीस, वाहतूक विभाग या सर्वांना घटनेबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व यंत्रणांना सोपवण्यात आल्याप्रमाणे त्यांची कामगिरी केली. यावेळी रुग्णालयांनाही सतर्क करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाकडून तात्काळ घटनास्थळी रुग्णावाहिका पाठवण्यात आल्या. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. अशा प्रकारे हे हा सराव करण्यात आला. यावेळी सर्व यंत्रणांना त्यांची जबाबदारी समजवण्यात आली.
पावसामुळे तारांबळ
युद्धजन्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी नागरी संऱक्षण विभगाकडून हा सराव करण्यात आला. नागरी संरक्षण विभागात सध्या दीडशे जण कार्यरत आहेत. एक हजार स्वयंसेवी या सरावाला सामील झाले होते. मुंबईतील क्रॉस मैदान परिसरात सर्व स्वयंसेवी व नागरी संरक्षण विभागात अधिकारी दुपारी चार वाजता मॉकड्रील करण्यात आले. पण मॉकड्रील सुरू झाल्यानंतर मुसळधार पाऊस पडू लागला. त्यामुळे सरावाच्या ठिकाणी उपस्थित स्वयंसेवींची तारांबळ उडाली. त्याच परिणामही सरावावर झाला.
२५ वर्षांपासूनच्या सरावामुळे मला आत्मविश्वास होता- स्वयंसेवी
क्रॉस मैदान येथील इमारतीवर बॉम्ब हल्ला झाल्यानंतर त्या इमारतीला आग लागल्याचे चित्र उभे करण्यात आले होते. या आगीत जखमींना इमारतीच्या छतावरून दोरीच्या साह्याने खाली उभ्या रुग्णवाहिकांमध्ये बसवण्याचा सराव करण्यात आला. त्यात सहभागी स्वयंसेवी सचिन गावडे हे गेल्या २५ वर्षांपासून नागरी संरक्षणाचे धडे घेत आहेत. बँकेत नोकरी करणारे गावडे यांनी १९९२ मध्ये सर्व प्रथम नागरी संरक्षणाचे प्रशिक्षण घेतले होते. गेल्या २५ वर्षांपासून नियमीत सराव असल्यामुळे आग लागली, इतर आणिबाणीची स्थिती आली, तरी आपण इतरांचे प्राण वाचवू शकतो हा विश्वास होता. तो सरावच आज कामी आला. त्यामुळे कोणतेही दडपण नव्हते, असे गावडे यांनी सांगितले. याशिवाय संभाजी साळुंखे हेही या सरावात सहभागी झाले होते. इलेक्ट्रॉनिक अभियंते असलेले साळुंखे यांनीही नागरी सुरक्षेचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले.
नियमीत सराव वर्ग
नागरी संरक्षण विभागाबाबत नागरिकांमध्ये कोणतीही जागृती नसल्याचे दिसून आले. महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात नागरी संरक्षणाबाबत महिन्याला एक-दोन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते. नागरी संरक्षण विभागाच्या राज्यस्तरावरील मुख्यालय मुंबईतील क्रॉस मैदान व देशाचे मुख्यालय नागपूरमध्ये आहे. तेथे नागरी संरक्षणाचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते. त्यात अग्निशमन, पूर स्थितीत कोणती काळजी घ्यायची, प्राथममोपचार, आणिबाणीच्या स्थिती नागरिकांनी घ्यायची काळजी, बाबतचे प्रशिक्षण दिले जाते.
सामान्यांसाठी सराव नाही
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार बुधवारी देशभरात मॉकड्रील असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ज्याप्रमाणे सर्व नागरिकांना १९७१ मध्ये याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच सर्व नागरिकांना यात सहभागी करण्यात येणार असल्याचे वाटले. पण प्रत्यक्षात नागरी संरक्षण विभाग, पोलीस, अग्निशमन दल, महापालिका, रुग्णालयांचे कर्मचारी व स्वयंसेवी यांनाच या युद्ध सरावात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिक दुपारी चार वाजता सर्वत्र सायरन वाजेल, याची प्रतिक्षा करत होते. पण तसे झाले नाही.
सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षण कमी झाले
मध्यंतरीच्या काळात सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम कमी झाले होते. मात्र, आता नव्याने प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये सिव्हिल डिफेन्स विभाग व मुंबई विद्यापीठात करार करण्यात आला असून अभ्यासक्रमात लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम समाविष्ट केला जाणार आहे. आणि त्यावर काम सुरु असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
पाच ते सहा दिवस विभागनिहाय मॉक ड्रिल सुरु राहणार
मॉकड्रील दरम्यान मुंबई भागात केवळ दोन ते अडीच मिनिटे भोंगा वाजला. तसेच, तारापूर आणि गोवंडी भागात रात्री ८ वाजता युद्धजन्य परिस्थितीत वापरात येणारी ब्लॅक आउट रणनिती वापरण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत तेथील नागरिकांना पूर्वसुचना देण्यात आली होती. पुढील पाच ते सहा दिवस विभागनिहाय मॉक ड्रिल सुरु राहणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.