विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने समन्वय साधीत संयुक्तपणे सत्ताधारी भाजपची कोंडी केल्याने दोन मंत्र्यांची चौकशी किंवा एका अधिकाऱ्याची बदली सरकारला करावी लागली. विरोधक एकत्र आल्यास त्रासदायक ठरते याचा अनुभव भाजपलाही आला. गेल्या दोन अधिवेशनांमध्ये विरोधकांची एकी बघायला मिळाली असली तरी गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीतील घडामोडींमुळे दिल्लीत काँग्रेस व राष्ट्रवादीत बेकी निर्माण झाल्याने त्याचे पडसाद राज्यातही उभय पक्षांच्या संबंधावर होऊ शकतात.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापाठोपाठ पावसाळी अधिवेशनात काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, समाजवादी पार्टी या विरोधकांमध्ये समन्वय बघायला मिळाला. शुक्रवारी संपलेल्या पावसाळी अधिवेशनात तर प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई या दोन मंत्र्यांची चौकशी आणि वादग्रस्त अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची बदली हे विरोधकांचे यश आहे. विरोधकांनी एकत्रितपणे दिलेल्या लढय़ाने हे शक्य झाले. पावणेतीन वर्षांत विरोधकांना मिळालेले हे पहिलेच यश आहे.
विरोधकांमधील वाढलेली एकी भाजपसाठी धोक्याचा इशारा मानला जातो. त्यातूनच विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आगामी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होऊ शकतो.
गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना राष्ट्रवादीची दोन्हीही मते मिळाली नाही, असा काँग्रेसचा आक्षेप आहे, तर एका आमदाराचे मत मिळाल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. विरोधकांची एकी निर्माण करण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीवर राष्ट्रवादीने बहिष्कार घातला. गुजरातमध्ये काँग्रेसने केलेल्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर बहिष्कार घातल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या कलाने सारे निर्णय घेणाऱ्या अहमद पटेल यांनाच राष्ट्रवादीने धोका दिल्याने काँग्रेसमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. मुंबईत दोन्ही पक्षांमध्ये समन्वय असला तरी दिल्लीच्या पातळीवर मात्र संबंधात कटुता निर्माण झाली आहे.
पहिल्यांदा सेनेचे मंत्री लक्ष्य
पावसाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपची कोंडी केली. याबरोबरच जयंत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे या नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेला लक्ष्य केले. आतापर्यंत फक्त भाजपच लक्ष्य होत असे, पण पहिल्यांदाच शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांच्यावरही आरोप झाले.
राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांना एकी हवी
राष्ट्रवादीच्या भाजपबरोबरील संबंधाबाबत होणाऱ्या चर्चेने पक्षाचे नुकसान होते. राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांना मात्र काँग्रेसबरोबरच संबंध व समन्वय कायम राहावा, अशी भूमिका आहे. भाजपचा सामना करण्याकरिता दोन्ही काँग्रेस एकत्र राहणे ही गरज असल्याचे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील आदी नेत्यांचेही मत आहे. अहमद पटेल हे दुखावले गेल्याने भविष्यात राष्ट्रवादीच्या कलाने दिल्लीत निर्णय होणार नाहीत हे मात्र नक्की.