मुंबई : राज्य विधिमंडळात आयोजित करण्यात आलेल्या अंदाज समितीच्या राष्ट्र्रीय परिषदेत उपस्थित पाहुण्यांना चांदीच्या ताटात जेवण देत शाही पाहुणाचार करत शासकीय निधीची उधळपट्टी केल्याप्रकरणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जून खोतकर यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
‘खासदार-आमदारांच्या मेजवानीला चांदीची थाळी’ या ‘लोकसत्ता’च्या वृत्क्वर विरोधकांनी टीका केली. अंदाज समितीच्या दौऱ्याच्या वेळी १ कोटी ८४ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली होती. या प्रकरणावर पडदा पडलेला नाही तोच या समितीच्या राष्ट्रीय अधिवेशनात पाहुण्यांसाठी चांदीची ताटे वापरल्याचे समोर आले आहे. चांदीच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये हा मोत्याचा घास भरवणाऱ्याचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (उद्धव ठाकरे) यांनी केली.
राज्यात दिवसाला सरासरी ८ शेतकरी कर्जापायी आत्महत्या करतात. चार वर्षे झाले शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान दिले नाही. कंत्राटी सरकारी कर्मचाऱ्यांचे चार महिने वेतन नाही, कारण, राज्याची आर्थिक स्थिती ठीक नाही. असे असताना राज्यकर्ते चांदीच्या ताटात जेवत असतील तर ही अय्याशी आहे, अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणाले.
धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये अंदाज समितीच्या सदस्यांसाठी जमा केलेले मोठे घबाड नुकतेच सापडले होते. चांदीच्या ताटात पाहुणचार हा समितीच्या तमाशाचा दुसरा वग आहे. शाही पाहुणचार झोडून काटकसर कशी करायची, हे समितीने सांगितले असावे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. शासनाच्या योजना ठप्प आहेत. या संकटात सत्ताधाऱ्यांनी चांदीच्या ताटात पाच हजार रुपयांच्या थाळीचा ‘ शाही ‘ अनुभव घेतला. गरिबांच्या वाट्याचे अन्न बाजूला ठेऊन, स्वतः मात्र शाही थाटात जगणे ह सामान्य जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
प्रशासनाची सारवासारव
दैनिक लोकसत्ताने यासंदर्भात वृत्त दिल्यानंतर विधिमंडळ प्रशासनाने जेवणासाठी वापरलेली ताटे चांदीची नसून चांदीची कल्हई केलेली होती, असा दावा खाजगीत केला आहे. यावर विधिमंडळ प्रशासन अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही.