सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे अकादमीला आमंत्रण

राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने ऑस्कर अकादमीला मुंबईत कार्यालय सुरू करण्याचे आमंत्रण दिले असून अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मुंबईत ऑस्कर अकादमीचे कार्यालय सुरू झाल्यास भारतीय सिनेमा आणि कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळेल, अशी आशा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. तावडे यांच्या प्रस्तावाबाबत अकादमीच्या जूनमध्ये होणाऱ्या बैठकीत विचार करण्याचे आश्वासन जॉन बेली यांनी दिले. ते सध्या भारत दौऱ्यावर असून राज्य मराठी पुरस्कारांचे वितरण यावेळी त्यांच्या हस्ते होणार आहे.

राज्य मराठी पुरस्कार वितरण सोहळा रविवारी वरळीच्या राष्ट्रीय

क्रीडा अकादमीत होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने जॉन बेली प्रथमच भारतात आले आहेत. बेली यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी खास संवाद साधला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांच्यासह, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, ऑस्कर अकादमीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर आदी उपस्थित होते.

ऑस्कर अकादमी लॉस एंजेल्स येथे भव्य संग्रहालय उभारत असून मार्च २०२० पर्यंत त्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती जॉन बेली यांनी दिली. या संग्रहालयात भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा कांस्य पुतळा उभारावा, अशी विनंती सरकारने केली असून मराठी चित्रपटसृष्टीलाही संग्रहालयात स्थान मळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.