मुंबई : मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या आड आलेली झाडे हटवून ती विविध ठिकाणी पुनर्रोपित केली. आरे वसाहतीसह इतर ठिकाणी पुनर्रोपित करण्यात आलेल्या ६६५ झाडांपैकी केवळ २३१ झाडे जगली असून ४३४ झाडे मृत पावली आहेत.
झाडे जगण्याचा दर केवळ ३४ टक्के असून झाडे मृत होण्याचा दर ६४ टक्के असल्याचे उघडकीस आले आहे. मेट्रो ३ मार्गिका वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून वादग्रस्त ठरली आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली असून काही झाडे काढून इतर ठिकाणी पुनर्रोपित करण्यात आली आहेत. त्यानुसार आरे वसाहतीसह इतर ठिकाणी पुनर्रोपित करण्यात आलेल्या झाडांची माहिती वॉचडॉग फाऊंडेशनचे निकोलस अल्मेडा यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करून एमएमआरसीकडे मागितली होती.
हेही वाचा – मुंबई : कोकण रेल्वेवर वीर आणि खेडदरम्यान ब्लॉक, चार रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत
एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, आरे कॉलनीत ५८९, आरे कॉलनीतील अन्य भूखंडावर ४१, कफ परेडमध्ये ४ आणि मेट्रो स्थानकासाठी कापण्यात आलेल्या ५२ अशा एकूण ६६५ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले होते. पुनर्रोपित करण्यात आलेल्या या ६६५ झाडांपैकी केवळ २३१ झाडे जगली असून ४३४ झाडे मृत झाल्याची माहितीही एमएमआरसीकडून देण्यात आली.
झाडे जगण्याचा दर फारच कमी म्हणजे केवळ ३४ टक्के असून झाडे मृत होण्याचा दर मात्र ६४ टक्के असल्याचे उघडकीस आले आहे. झाडांचे पुनर्रोपण केल्यानंतर एमएमआरसीने योग्य ती काळजी घेतली नाही. तसेच पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे मुळ ठिकाणांहून योग्यप्रकारे काढण्यात येत नसल्याने वा योग्य प्रकारे पुनर्रोपित करण्यात येत नसल्याने मृत होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.