SpiceJet Aircraft safely landing in Mumbai: चाक निखळलेल्या स्पाइसजेट कंपनीच्या बॉम्बार्डियर विमानाचे मुंबई विमानतळावर यशस्वीरित्या लँडिंग करण्यात आले आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे. ७५ प्रवाशी असलेल्या स्पाइसजेट क्यू ४०० या विमानाने गुजरातच्या कांडला विमानतळावरून उड्डाण घेतले होते. मात्र त्याचे एक चाक तेथील विमानतळावर निखळले. मात्र यानंतरही मुंबई विमानतळावर विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग करण्यात यश आले आहे, त्यामुळे सुटकेचा निश्वास सोडला गेला.
स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी कांडला ते मुंबई प्रवास करणाऱ्या क्यू४०० या विमानाचे उड्डाण झाल्यानंतर विमानाच्या बाहेरच्या बाजूचे चाक धावपट्टीवर आढळून आले. विमानाने मुंबई विमानतळावर यशस्वीरित्या लँडिंग केले असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले गेले.
दरम्यान मुंबई विमानतळावर काही वेळेसाठी इतर विमानांचे उड्डाण काही वेळेसाठी थांबविण्यात आले असून आणीबाणी जाहीर केली.
कांडला विमानतळाहून स्पाइसजेटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) विमानातून एक वस्तू खाली पडताना दिसली. यानंतर सदर विमानाच्या पायलटला याची माहिती देण्यात आली. तसेच एटीसीने धावपट्टीवर जीप पाठवून पडलेल्या वस्तूची खातरजमा केली. तेव्हा धावपट्टीवरून एक चाक आणि धातूची रिंग सापडली, अशी माहिती कांडला एटीसीने दिली.
दरम्यान मुंबई विमानतळालाही याची माहिती दिली गेली. मुंबईत विमानतळावर अग्निशमन दल आणि बचाव पथकाला तयार राहण्याचे आदेश दिले गेले होते. तथापि दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विमान सुरक्षितपणे उतरवले गेले.
विमानाचे चाक निखळणे ही एक गंभीर घटना आहे. सुदैवाने चाकाची दोन युनिट असल्याने आणि एक विमानाला जोडलेले असल्यामुळे आजचा दिवस नशीबवान ठरला, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) माजी अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले.
विमानतळाच्या प्रवक्त्यांनी काय म्हटलं?
या संपूर्ण घटनेबाबत सीएसएमआयएच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, “कांडला येथून आलेल्या एका विमानाला तांत्रिक समस्येची तक्रार केल्यानंतर १२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:५१ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. खबरदारी म्हणून संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. विमान धावपट्टी २७ वर सुरक्षितपणे उतरलं आणि सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. त्यानंतर काही वेळात सामान्य कामकाज पुन्हा सुरू झालं. सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”