मुंबई : डेंगी हा एक विषाणूजन्य आजार असून तो एडिस डास चावल्याने होतो. पावसाळ्यात डासांच्या प्रादुर्भावाने हा रोग पसरण्याची दाट शक्यता असते. तसेच, जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत मुंबईत तब्बल २ लाख १७ हजार ९८१ उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. महानगरपालिकेमार्फत संबंधित भागांमध्ये धूम्रफवारणी सुरु असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. ‘भाग मच्छर भाग’ आणि ”मुंबई अगेन्स्ट डेंगी” या मोबाईल ॲपमधून शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे कोणती आणि ती कशी ओळखावी, याबाबतचीही माहिती नागरिकांना ॲपमधून मिळणार आहे.
डासांची उत्पत्तीस्थाने शोधून त्यांचे उच्चाटन करण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या कीटकनाशक विभागामार्फत कार्यवाही करण्यात येते. राष्ट्रीय डेंगी दिन १६ मेच्या निमित्ताने यंदाचे ”तपासा, स्वच्छ करा, झाकून ठेवा – डेंगीला हरविण्याचे उपाय करा” हे घोषवाक्य आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाने तंत्रज्ञानावर आधारित पुढाकार घेत ‘भाग मच्छर भाग’ आणि ”मुंबई अगेन्स्ट डेंगी” या मोबाईल ॲपचा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
हिवताप, डेंगी आणि चिकुनगुनिया आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी लघुपटांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. जानेवारी २०२४ ते मे २०२५ दरम्यान एकूण २ लाख १७ हजार ९८१ उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. यापैकी, जानेवारी ते ६ मे २०२५ या कालावधीत सर्व विभागांमध्ये दिलेल्या भेटीत एकूण २५ हजार १६९ ठिकाणी एडिस डासांची उत्पत्तीस्थाने आढळली.
तसेच २ लाख २९२ इमारती आणि २७ लाख १९ हजार ८९५ झोपड्यांमध्ये धूम्रफवारणी करण्यात आली. तर, जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एकूण १ लाख ९२ हजार ८१२ उत्पत्तीस्थाने आढळली होती. तसेच ५ लाख ९० हजार ४४४ इमारती आणि ७९ लाख ६९ हजार ४२४ झोपड्यांमध्ये कीटकप्रतिबंधक धूम्रफवारणी करण्यात आली होती. दरम्यान, २०२४ मध्ये मुंबईत डेंगीचे एकूण ५ हजार ९०६ रुग्ण आढळले होते. ही संख्या १ ते १४ मे २०२५ या कालावधीत ३११ इतकी आहे.
‘भाग मच्छर भाग’
डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “भाग मच्छर भाग” हे मोबाईल एप्लिकेशन नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती करून नागरिकांना सहभागी करून घेतले जाईल.
‘मुंबई अगेन्स्ट डेंगी’
‘मुंबई अगेन्स्ट डेंगी’ हे ॲप उपलब्ध करण्यात आले असून नागरिकांना डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे कोणती आणि ती कशी ओळखावी याबाबत माहिती त्यावर मिळते. या ॲपद्वारे नागरिक आपल्या परिसरातील हिवताप आणि डेंग्यूच्या डांसांच्या उत्पत्तीचे ठिकाण शोधून ते नष्ट करू शकतात.
जनजागृती मोहीम
‘भाग मच्छर भाग’ व्यापक जनजागृती विशेष मोहीम – मलेरिया, डेंग्यू आणि चिकूनगुनिया आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी, लघुपटच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ही विशेष मोहीम मराठी, हिंदी, चित्रपट सृष्टीतील अभिनेते तसेच सेलिब्रिटी, प्रसिध्द व्यक्ती यांचा सहभाग घेण्यात येत असून डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवाहन करणारा सेलिब्रिटींमार्फत संदेश व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
मुंबईकरांना आवाहन
– तापाची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्या.
– परिसरात स्वच्छता ठेवा. टिन, टायर, नारळाच्या करवंट्यांमध्ये पाणी साचू देऊ नका.
– आठवड्यातून एकदा ‘ड्राय डे’ पाळा. पाण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ करा.
– फुलदाण्या, कुंड्यांतील पाणी बदलत रहा. – डास प्रतिबंधक फवारणी केलेल्या मच्छरदाणीचा वापर करा.