मुंबई : दहीहंडी उत्सवात उंचच उंच थरावरून पडून जखमी झालेल्या गोविंदाची संख्या २९४ वर पोहचली आहे. त्यातील ११ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

दहीहंही फोडताना थरावरून पडून जखमी झालेल्या २९४ गोविंदांपैकी मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २७८ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर राज्य सरकारच्या जे.जे. रुग्णालय, जी.टी. रुग्णालय व सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये १३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना थरावरून पडल्याने २७८ जण जखमी झाले आहेत. यातील २४९ जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले, तर २९ गोविंदांवर उपचार सुरू असून, त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमी गोविंदांपैकी केईएम रुग्णालयामध्ये सर्वाधिक ६७ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, ९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील चार रुग्णांना अस्थिव्यंग विभागात तर पाच रुग्णांना शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले आहे.

त्याखालोखाल जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये ४१ जणांवर उपचार करण्यात आले असून, त्यातील तीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नायर रुग्णालयामध्ये १५ जणांवर उपचार करण्यात आले असून पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुपर रुग्णालयामध्ये १४ जणांवर बाह्य रुग्ण विभागामध्ये उपचार करण्यात आले. शीव रुग्णालयामध्ये १२ जणांवर उपचार करण्यात आले असून एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील विविध उपनगरीय रुग्णालयांमध्ये १२९ जणांवर उपचार करण्यात आले असून त्यातील सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

राज्य सरकारच्या रुग्णालयात १६ रुग्णांवर उपचार

मुंबईतील राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये १६ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. जे.जे. रुग्णालयामध्ये पाच जखमी गोविंदा दाखल करण्यात आले होते. तसेच जी.टी. रुग्णालयामध्ये १० जणांना दाखल करण्यात आले. सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये एका गोविंदावर उपचार करण्यात आले.