विविध नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान होणाऱ्या शेतीमालाच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत धोरण निश्चित करणे आवश्यक आहे, असे मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत व्यक्त केले.
कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी) यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना खडसे यांनी आगीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची नियमात तरतूद नाही, पण सहानुभूतीपूर्वक या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले. रायगडसह राज्याच्या विविध भागांमध्ये आगींमुळे शेतीमालाचे नुकसान होते तेव्हा मदतीच्या धोरणात बदल करण्याची मागणी सुभाष पाटील (शेकाप ) यांनी केली. तसेच वणवे लागू नयेत म्हणून उपाय योजण्याची मागणी त्यांनी केली. कोकणावर अन्याय होत असल्याचा मुद्दा नीतेश राणे (काँग्रेस) आणि वैभव नाईक (शिवसेना) यांनी मांडला.