Pahalgam Terror Attack Updates Today : पहलगाममधील छोटे स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या बैसरन येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आणि काश्मीरमधील वातावरण तंग झाले. ठिकठिकाणी दहशतवादी हल्ल्याचे पडसाद उमटू लागले. कुठे दुकाने बंद झाली तर कुठे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले. चौकाचौकात नाकाबंदी, टप्प्याटप्प्यावर प्रत्येकाची तपासणी सुरू झाली आणि नंदनवनाची सफर करण्यासाठी गेलेले पर्यटक कमालीचे अस्वस्थ झाले.

श्रीनगरवरून जम्मूमधील कटऱ्याची वाट धरणाऱ्या बहुसंख्य पर्यटकांना द्राविडीप्राणायाम करीत तब्बल २० तास खडतर प्रवास करावा लागला. तर वैष्णव देवीचे दर्शन घेऊन श्रीनगर सफरीला सुरुवात करणाऱ्या पर्यटकांनी पुढे जाण्याचा बेतच रद्द करावा लागला.

बैसरन आवडते पर्यटनस्थळ

दरवर्षी पहलगामजवळील बैसरन येथे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जातात. बर्फाची दुलई पांघरलेला हा परिसर केवळ पुण्या-मुंबईतीलच नव्हे तर देशभरातील पर्यटकांना भुरळ पाडतो. त्यामुळे जम्मू-काश्मीरला जाणारे पर्यटक आवर्जून बैसरनला भेट देतात. सध्या उन्हाळ्याची सुट्टी पडली असून मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरला जात आहेत. त्यामुळे स्थानिक खासगी वाहतूक सेवा, शिकाराचालक, हाऊसबोट चालक-मालक, हॉटेलचा व्यवसाय तेजीत आहे. मात्र बैसरनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या सर्वांच्या उत्पन्नावर गदा येण्याची वेळ ओढवली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण परिस्थितीमुळे अनेक पर्यटकांनी काश्मीरमधून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईमधून श्रद्धा टूर्ससोबत काही पर्यटक गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरला रवाना झाले होते. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि आसपासच्या परिसरात पर्यटकांनी यथेच्छ पर्यटन केले आणि या सर्वांनी नियोजनानुसार मंगळवारी दुपारी श्रीनगरमधून जम्मूमधील कटराच्या दिशेने प्रस्थान केले. मात्र दरम्यानच्या काळात दहशतवाद्यांनी बैसरन येथे दहशतवादी हल्ला केला होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत होती. सामानाची तपासणीही करण्यात येत होती. एकूणच वातावरणामुळे पर्यटक कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्यातच सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग १ ए बंद करण्यात आला होता. त्यामुळे पर्यटकांना द्राविडीप्राणायाम करून मुघल रोडमार्गे कटरा येथे जावे लागत होते, असे श्रद्धा टूर्सचे सर्वेसर्वा शरद वर्तक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

सुविधांचा अभाव

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग १ ए बंद करण्यात आल्यामुळे जम्मूच्या दिशेने जाणारी सर्वच वाहने मुघल रोडमार्गे रवाना होत होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मुघल रोडवर आवश्यक सुविधांचा अभाव आहे. या मार्गावर पेट्रोल पंपही दूरदूर आहेत. या मार्गावरील बहुतांश मार्ग निर्जन असल्यामुळे आवश्यक गोष्टी मिळू शकल्या नाहीत, अशी खंत शरद वर्तक यांनी व्यक्त केली.

प्रवासाचे ते २० तास…

‘नियोजनानुसार श्रीनगरवरून सकाळी निघालो. मात्र जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग १ ए मार्ग बंद असल्यामुळे सर्वच वाहने मुघल रोडमार्गे वळवाव्या लागल्या. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. काही टप्प्यावर तर वाहने मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. त्यामुळे सर्वच मंडळी हैराण झाली होती. या मार्गावर हॉटेल्समध्येही प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे दुपारी, रात्री जेवणाच्या वेळी अनेकांना ताटकळावे लागते. तब्बल २० तास प्रवास करून पर्यटकांसोबत आम्ही बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास कटरा गाठले आणि ठरलेल्या हॉटेलमध्ये पर्यटक विसावले,’ असे शरद वर्तक यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटकांची लुबाडणूक

दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील वातावरणच बदलून गेले. वाहनचालक, हॉटेलचे दर गगनाला भिडले. इतकेच नव्हे तर श्रीनगर – जम्मू विमान सेवेच्या दरातही भरमसाट वाढ करण्यात आली. एरवी श्रीनगर-जम्मू विमान प्रवासासाठी तीन हजार रुपये मोजावे लागत होते. त्याच तिकीट दरात मंगळवारी मोठी वाढ झाली आहे. पर्यटकांची एकूणच लूट सुरू झाली, अशी खंत शरद वर्तक यांनी व्यक्त केली.