मुंबई : चित्रपट निर्माता मुश्ताक नाडियादवाला यांच्या दोन अल्पवयीन मुलांच्या ठावठिकाण्याची माहिती पाकिस्तान सरकारकडे मागण्यात आली आहे. त्यासाठी चार वेळा स्मरणपत्रेही पाठवण्यात आली. मात्र पाकिस्तान सरकारकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असा दावा केंद्र सरकारने उच्च न्यायालयात केला.

पत्नी आणि मुलांना पाकिस्तानमध्ये बेकायदा ताब्यात ठेवल्याचा आरोप करून त्यांना परत आणण्याच्या मागणीसाठी नाडियादवाला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी केंद्र सरकार काहीच सहकार्य करत नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयाने केंद्र सरकारच्या सहकार्य न करण्याच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. तसेच संबंधित विभागाशी केवळ पत्रव्यवहार करून थांबू नका, याचिकाकर्त्यांच्या फोनला उत्तरेही द्या. त्यांच्या मुलांचा आणि त्यांचा संपर्क होईल यासाठी प्रयत्न करा, असेही न्यायालयाने सरकारला बजावले होते. त्यावर याचिकाकर्ते आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, असे केंद्र सरकारतर्फे न्यायालयाला आश्वासित करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयाने बजावलेल्या तीन पत्रव्यवहारांनाही पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून आजपर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही, असा दावाही केंद्र सरकारने अहवालात केला. याशिवाय भारत सरकारने १३ मार्च रोजी पाकिस्तान सरकारला आणखी एक स्मरणपत्र पाठवल्याचे न्यायालयास सांगण्यात आले.